कागलमध्ये 'श्री गणेशा आरोग्याचा' अभियानांतर्गत सर्व रोग व नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन.
कागलमध्ये 'श्री गणेशा आरोग्याचा' अभियानांतर्गत सर्व रोग व नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन.
-----------------------------
सलीम शेख
-----------------------------
कागल : 'श्री गणेशा आरोग्याचा' या अभियानांतर्गत ग्रामीण रुग्णालय, कागल आणि वीर जवान मित्र मंडळ, कागल शहर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ सप्टेंबर, २०२५ रोजी एक भव्य सर्व रोग निदान आणि नेत्रचिकित्सा तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांना आरोग्यविषयक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.
या शिबिरामध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी व प्रयोगशाळा विभागाने उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक त्या प्रयोगशाळा चाचण्या केल्या. यासोबतच, स्वस्तिक हॉस्पिटलच्या वतीने हृदयरोगाशी संबंधित आवश्यक तपासण्याही करण्यात आल्या. विशेषतः या शिबिराचा लाभ वयस्कर नागरिकांना मोठ्या प्रमाणात झाला. नंदादीप नेत्र चिकित्सालयाच्या चमूने परिसरातील नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी केली. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.वाय. डी. माने बालगृहात विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम याच दिवशी झाला.यावेळी डॉ. सरिता थोरात, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, कागल यांनी त्यांच्या रुग्णालयातील अन्य वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसह वाय. डी. माने बालगृहाला भेट दिली. या भेटीदरम्यान, बालगृहातील विद्यार्थ्यांना स्वयं-स्वच्छता किट प्रदान करण्यात आल्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी योगाची अतिशय शिस्तबद्ध व कमी वेळेत प्रात्यक्षिके सादर केली. यानंतर, दंतचिकित्सक डॉ. किल्लेदार यांनी विद्यार्थ्यांना दात घासण्याची योग्य पद्धत व मौखिक आरोग्याविषयी सविस्तर माहिती दिली.
आर.बी.एस.के. टी.एम. (Rashtriya Bal Swasthya Karyakram - Team) यांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आणि हात धुण्याची शास्त्रीय पद्धत प्रात्यक्षिकांसह समजावून सांगितली. कार्यक्रमाच्या शेवटी, सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. बालगृहाच्या वतीने मुख्याध्यापक साळुंखे यांनी सर्वांचे आभार मानले.
'श्री गणेशा आरोग्याचा' अभियानांतर्गत ग्रामीण रुग्णालय, कागलने गेल्या चार दिवसांमध्ये अत्यंत उपयुक्त उपक्रम राबवले, याचे सर्व श्रेय वैद्यकीय अधीक्षक डॉ. सरिता थोरात यांना जाते.
Comments
Post a Comment