“औषधी वनस्पती रानभाज्यांचा समृध्द वारसा जोपासला; आदर्श बाल विद्या मंदिराच्या प्रदर्शनातून.
“औषधी वनस्पती रानभाज्यांचा समृध्द वारसा जोपासला; आदर्श बाल विद्या मंदिराच्या प्रदर्शनातून.
-----------------------------
जोतीराम कुंभार
-----------------------------
आदर्श बालविद्यामंदिर सदाशिवनगर येथे “रानभाज्या आणि औषधी वनस्पती प्रदर्शन” या उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत गायकवाड यांच्या नियोजनातून या कार्यक्रमास विशेष स्वरूप लाभले. विद्यार्थ्यांना परंपरागत अन्नसंपदा व पर्यावरणाची जाणीव करून देणारा हा उपक्रम सर्वांच्याच कौतुकास पात्र ठरला.
कार्यक्रमात वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी व पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी शाळेला अकरा झाडांची रोपे भेट देऊन कृतीतून पर्यावरणाचा संदेश दिला. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य पुरस्कार विजेत्या वनपाल प्रतिभा पाटील उपस्थित होत्या.
वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी म्हणाले
“रानभाज्या आणि औषधी वनस्पती ही आपल्या निसर्गाची खरी शिदोरी आहे. आजच्या पिढीला त्यांची ओळख करून देणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक घरात, प्रत्येक शाळेत किमान एक रानभाजीचा ताटवा आणि एक औषधी बाग असली पाहिजे.”
पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले म्हणाले कि,
“विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकातून शिकणे पुरेसे नाही, तर जीवनाशी जोडणारे प्रयोग अनुभवायला हवेत. रानभाज्यांचे महत्त्व कळले तर मुलं अन्न वाचवतील, रासायनिक पदार्थांपासून दूर राहतील. शाळेने घेतलेला हा उपक्रम समाजासाठीही प्रेरणादायी आहे.”
कर्नाटकातील
थीमक्का ,मोलाई कोठाणी,सयाजी शिंदे यांच्या कार्यांची माहिती देऊन झाडेच आमची खरी हिरो आहेत हे स्पष्ट केले.
राज्य पुरस्कार विजेत्या वनपाल प्रतिभा पाटील म्हणाल्या कि,
“पिझ्झा-बर्गरच्या युगात पारंपरिक रानभाज्यांचा साठा विसरला जातोय. मुलांनी आणि पालकांनीही आपल्या अंगणात सहज उगवणाऱ्या भाज्यांकडे लक्ष द्यायला हवे. या भाज्या पोषणमूल्यांनी परिपूर्ण असून आजारांवर नैसर्गिक औषधासारखे काम करतात. अशा प्रदर्शनातून आरोग्यदायी जीवनशैलीला दिशा मिळते.” कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख मुख्याध्यापक प्रशांत गायकवाड यांनी करून दिली. शाळेत तयार केलेल्या ज्युनिअर केजी, सिनिअर केजी. च्या नवीन पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. विविध स्पर्धा परीक्षांत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांनी केला. पाहुण्यांचे स्वागत वृक्षरोप व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी मांडलेल्या मॉडेल्स, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पालकांसोबत झालेला संवाद या सर्वामुळे कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.
“रानभाज्या आपल्या संस्कृतीचा गंध आहेत, औषधी वनस्पती आरोग्याचा आधार आहेत आणि झाडं जीवनाचा श्वास आहेत” – हा प्रभावी संदेश या उपक्रमातून उमटला
Comments
Post a Comment