Header Ads

श्रीमंत जयसिंग महाराज उद्यानाचे सुशोभीकरण अर्धवटच टेंडरनंतर दोन वर्ष उलटूनही पालिकेची कारवाई नाही.

 श्रीमंत जयसिंग महाराज उद्यानाचे सुशोभीकरण अर्धवटच

टेंडरनंतर दोन वर्ष उलटूनही पालिकेची कारवाई नाही.



जयसिंगपूर (प्रतिनिधी)नामदेव भोसले

शहराच्या मध्यवर्ती क्रांती चौकात असलेल्या श्रीमंत जयसिंग महाराज उद्यानाचे सुशोभीकरण अर्धवटच राहिले असून, तब्बल दोन वर्ष उलटूनही नगरपरिषदेच्या प्रशासनाने ठेकेदाराविरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही.


सन २०२२-२३ च्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून या कामासाठी ७१ लाख १० हजार १६१ रुपयांचा टेंडर पुण्याच्या VDK फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीला ३० ऑक्टोबर २०२३ रोजी मंजूर करण्यात आला होता. वर्क ऑर्डरनुसार हे काम मंजुरीपासून सहा महिन्यांत पूर्ण होणे बंधनकारक होते. काम वेळेत पूर्ण न झाल्यास प्रति दिवस पाचशे रुपयांचा दंड ठेकेदारावर आकारला जाणार होता.

मात्र, दोन वर्ष उलटूनही काम पूर्ण झालेले नाही. विशेष म्हणजे, आजवर ना दंड आकारण्यात आला, ना टेंडर रद्द झाले, ना ठेकेदारावर कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या भूमिकेविषयी नागरिकांत संशय निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, “टेंडरची इतकी मोठी रक्कम मंजूर झाल्यानंतरही काम अपूर्ण आहे. प्रशासन ठेकेदाराला जाणीवपूर्वक मोकळे सोडत आहे. उद्यानाचे सुशोभीकरण न झाल्यामुळे मुलांना व नागरिकांना अपेक्षित सुविधा मिळालेल्या नाहीत.”

या प्रकारामुळे नगरपरिषदेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, उद्यान प्रकल्प आता नागरिकांच्या चर्चेचा व संशयाचा विषय ठरत आहे.

No comments:

Powered by Blogger.