Header Ads

शरीरातला आणि मनातला मळ घालवून टवटवीत व्हा.इंद्रजीत देशमुखांनी मुख्याध्यापकांना दिला तणावमुक्तीचा कानमंत्र६४ व्या राज्य अधिवेशनाची सांगता.

 शरीरातला आणि मनातला मळ घालवून टवटवीत व्हा.इंद्रजीत देशमुखांनी मुख्याध्यापकांना दिला तणावमुक्तीचा कानमंत्र६४ व्या राज्य अधिवेशनाची सांगता.

---------------------------------------

बच्चे सावर्डे प्रतिनिधी

 सुनिल पाटील 

---------------------------------------

कोल्हापूर : धकाधकीच्या जीवनात सुस्त, त्रस्त आणि विनाकारण व्यस्त रहाण्यापेक्षा शरीरातला आणि मनातला मळ घालवून टवटवीत अर्थात मस्त रहा असा कानमंत्र माजी प्रशासकीय अधिकारी आणि शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजीत देशमुख यांनी मुख्याध्यापकांना दिला . महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबई यांच्यावतीने आयोजित कराड येथील ६४ व्या राज्यस्तरीय अधिवेशनातील मुख्याध्यापकांचे ताणतणाव या विषयावर दुसऱ्या दिवसातील उद्बोधन पुष्प गुंफताना ते बोलत होते . अध्यक्ष स्थानी कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे होते .

       इंद्रजीत देशमुख पुढे म्हणाले की अन्य प्राण्यांपेक्षा मनुष्य प्राण्यास आनंद, ज्ञान, विज्ञानमय होणाऱ्या गोष्टी निसर्गाने अधिक दिल्या आहेत त्याचा गैरवापर होवू देवू नका . संस्था चालकांनीही आपल्या मुख्याध्यापकांच्या बलस्थानांचे कौतुक करावे . मुख्याध्यापकांशी संवाद आणि सुसंवाद साधल्यासच शाळा प्रगतीपथावर जाईल अन्यथा तणावच देण्याचा प्रयत्न केल्यास शाळेची अधोगती होते हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे . चालक, मालक होण्यापेक्षा पालकत्व निभावल्यास मुख्याध्यापक तणावमुक्त राहील हे सांगतानाच इंद्रजीत देशमुख यांनी दैनंदिन जीवनातील अनेक संदर्भ दिले . मुख्याध्यापकांनी आहार आणि विहार शैली जोपासण्याच्या सूचना केल्या . गुंतागुंतीच्या आयुष्यात सरळ जीवन जगण्याचा मूलमंत्रही त्यांनी सांगितला .

     कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षकांच्या आणि शिक्षणाच्या विविध समस्यांवर भाष्य केले . अधिकारी अडवणूकीसाठी नसून प्रश्न सोडवण्यासाठी असतात असे सांगून जुनी पेन्शन, टीईटी प्रश्न, सोडवणूकीसाठी आपण रस्त्यावरची लढाई करू मात्र प्रश्न सोडवू असे सांगितले .

       सातारा जिल्ह्याच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी काळाबरोबर मुख्याध्यापकांनी अद्ययावत असले पाहिजे असा संदेश दिला . विद्यार्थी केंद्रबिंदू मानल्यास शाळेची प्रगती लवकर होते असे सांगून गुणवत्तेचे निकष सांगितले . रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील यांनी जोपर्यंत शासन शिक्षणास गुंतवणूक मानावयास तयार नाही तोपर्यंत विकास अशक्य आहे . एआय विरुद्ध मानवी मेंदू अशीच लढाई भविष्यात होणार असून त्यामुळे मानवजात संपुष्टात येईल अशी भिती व्यक्त केली .

     प्रारंभी शाळास्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण या विषयावरील शोधनिबंधाचे सादरीकरण सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाच्यावतीने प्रतिनिधी अरविंद कदम यांनी केले . दुसऱ्या सत्रात सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघ नवनिर्वाचित कार्यकारणी आणि विविध जिल्ह्यातील गुणवंत मुख्याध्यापक आणि पदाधिका ऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला . यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स येथील सभागृहात सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाने नेटके नियोजन केले होते . ध्वज हस्तांतरण केल्यानंतर पसायदान म्हणून अधिवेशनाची सांगता करण्यात आली . दोन दिवस चाललेल्या या अधिवेशनात माजी शिक्षक आमदार भगवान साळुंखे, सातारा जिल्ह्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, सचिन नलवडे, चंद्रकांत जाधव, आर. वाय. पाटील, संजय सौंदलगे, विलास परीट,सुभाष माने, तानाजी माने, नंदकुमार सागर, अध्यक्ष मुकेश पाटील यांचेसह विविध जिल्ह्यातील दिडहजारहून अधिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते .

No comments:

Powered by Blogger.