Header Ads

“कंक दाम्पत्याच्या मृत्यूभोवती निर्माण झाला संभ्रम; वनविभाग व पोलिसांमध्ये मतभेद.

 “कंक दाम्पत्याच्या मृत्यूभोवती निर्माण झाला संभ्रम; वनविभाग व पोलिसांमध्ये मतभेद.




*******************

मलकापूर रोहित पास्ते

*******************

शाहुवाडी तालुक्यातील निनाई परळी परिसरातील गोलीवणे हद्दीत बिबट्याच्या हल्ल्यात कंक दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असली, तरी या प्रकरणी वनविभाग व पोलीस विभाग यांचे परस्परविरोधी मतमतांतर निर्माण झाल्याने या घटनेचा गुंता अधिकच गडद झाला आहे. तपासाची जबाबदारी एकमेकांवर ढकलत असल्याची खंत परिसरातून व्यक्त होत आहे.


सहा किलोमीटर अंतरावरील निर्जन धरणकाठी झोपडी करून वास्तव्य करणारे निनू यशवंत कंक (वय ६५) व पत्नी रखुबाई निनू कंक (वय ६०) हे दाम्पत्य शनिवारी मृत अवस्थेत आढळले. मुलगा सुरेश कंक यांनी या प्रकरणी शाहूवाडी पोलिसांत बिबट्याच्या हल्ल्याची फिर्याद दिली. परंतु वनविभागाने जंगली प्राण्याचा हल्ला असल्याचे स्पष्ट नाकारले आहे.


काल सायंकाळी पंचनामा झाल्यानंतर दोघांचे मृतदेह मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. मात्र पोलिसांनी अचानक मृतदेह कोल्हापूरला इन-कॅमेरा शवविच्छेदनासाठी रवाना केल्याने नातेवाईकांना तब्बल २४ तास मृतदेहांची प्रतीक्षा करावी लागली. आज दुपारी साडेतीन वाजता मृतदेह गोलीवणे वसाहतीत आणण्यात आले. त्या वेळी ग्रामस्थांनी अश्रू ढाळत कंक दाम्पत्याला अंतिम निरोप दिला. ऐन दिवाळीत परळी पंचक्रोशीवर शोककळा पसरली.


आज घटनास्थळी तपासासाठी एल.सी.बी. पथक, श्वान पथक व स्थानिक पोलिस दाखल झाले. महाबळ फार्महाऊसजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू असून, अद्याप कोणतेही संशयास्पद चित्र आढळले नसल्याचे पी.एस.आय. जाधव यांनी सांगितले. पुणे येथील वरिष्ठ प्रयोगशाळेतून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे श्री. पाटील यांनी नमूद केले.


प्रथमदर्शनी रखुबाईंच्या चेहरा व मानेवर खोल जखमा असल्याचे, तर निनूंच्या शरीरावर जखमा नसल्याने त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. शाहूवाडी पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांनी घटनास्थळी भेट देऊन “रखुबाईंचा मृत्यू प्राण्यांच्या हल्ल्यात झाला असावा” असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. अंतिम निष्कर्ष शवविच्छेदन अहवालानंतरच मिळेल, असे त्यांनी सांगितले.


परस्परविरोधी दावे – तपासाचा गुंता वाढला

वनविभागाने जंगली श्वापदाचा हल्ला नाकारला असून “रखुबाईंचे केसांचा पुंजका, डावा हात आणि उजवा पाय — हे परस्परविरोधी अवयव — एखादा प्राणी ठरवून तोडत नाही, तसेच निनूंचा मृतदेह अंदाजे ६० मीटर दूर जलाशयात सापडणे आणि त्यांच्या अंगावर जखमा नसणे ही बाब संशयास्पद आहे,” असे वनअधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


तर पोलीस अधिकारी मात्र ही घटना बिबट्याच्या हल्ल्याचीच असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे दोन्ही खात्यांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे तपास अधिक गुंतागुंतीचा बनला आहे. स्थानिक ग्रामस्थ मात्र जंगली प्राण्यांच्या वाढत्या हालचालींमुळे भयभीत झाले आहेत.


स्थानिक लोकप्रतिनिधींनीही वनविभाग व पोलीस विभाग “जबाबदारी एकमेकांवर ढकलत वेळ मारून नेत आहेत” अशी टीका केली आहे. या दोघांच्या संभ्रमात मृत कंक दाम्पत्याचे कुटुंब मात्र एकाकी व व्यथित झाले आहे.

No comments:

Powered by Blogger.