दिवाळी निमित्ताने किल्ले भुदरगड दीपोत्सवाने उजळला..
दिवाळी निमित्ताने किल्ले भुदरगड दीपोत्सवाने उजळला..
---------------------------------------भुदरगड प्रतिनिधी - प्रकाश खतकर
----------------------------------------
भुदरगड: - प्रतिवर्षी प्रमाणे ह्यावर्षीही एक पणती शिवरायांच्या चरणी, एक पणती हिंदवी स्वराज्याच्या चरणी ही संकल्पना अंतःकरणात साठवत किल्ले भुदरगडावरील शिवमंदिर, राजसदर, केदारलिंग व भैरवनाथ मंदिर व परिसरात दिवाळी निमित्ताने दीपोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
ज्या शिवछत्रपतींनी स्वराज्य स्थापन करुन संपूर्ण महाराष्ट्र उजळून टाकला. अनेक गडकोट किल्ल्यांची बांधणी केली ते गडकोट मात्र दीपावलीच्या काळात अंधारात असतात. नेमकं हेच हेरुन पर्यावरणमित्र अवधूत पाटील व कुटुंबीय, कोरीवडे गावचे भानुदास व श्रीधर कसेकर बंधू व मित्रमंडळी गेली 11 वर्षांपासून किल्ले भुदरगडावरील राजसदर, शिवमंदिर, केदारनाथ व भैरवनाथ मंदिर व परिसरात दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात.
सदर उपक्रमात राजसदर व शिवमंदिर परिसरातील प्लास्टिक कचरा एकत्र करुन गडावरून खाली नेण्यात आला. ऐतिहासिक वास्तू, तटबंदीवरील उगवलेले तण काढण्याबरोबरच पावसाळ्यात वृक्षारोपण केलेल्या वडाच्या झाडास पाणी घालण्यात आले. शिवमंदिर व राजसदरेवर रांगोळी काढण्याची जबाबदारी जान्हवी व मिथाली पाटील यांनी पेलली. रांगोळीचे उत्कृष्ठ नमुने, त्यासाठीची पूर्वतयारी, साहित्याची जमवाजमव अगदी तंतोतंत काटेकोरपणे पार पाडली.
दाटलेल्या धुक्याची तमा न बाळगता मावळ्यांनी शिवमंदिर, राजसदर परिसर रांगोळ्या, भगव्या पताका, आकाश कंदील, फुले, फुलांच्या पाकळ्या, माळानी, झावळ्यांचा वापर करीत सजवला. शिवमंदिरात भानुदास कसेकर यांनी शिवगारदाने दीपोत्सव सोहळ्याची सुरुवात केली. आसावरी व कार्तिकी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सहभागी सर्व मावळ्यांनी पणत्या, मेणबत्या प्रज्वलीत केल्या. पणत्यांच्या प्रकाशात पूर्ण परिसर न्हाऊन निघाला. छत्रपतींच्या जयघोषाने वातावरण शिवमय, मंगलमय होऊन आसमंत दणाणून गेले.
तेजोमय दीपोत्सवात भानुदास कसेकर, श्रीधर कसेकर, अथर्व पाटील, आर्यन पाटील, जगदीश मिसाळे, शुभम पाटील, कुणाल मिसाळे, किशोर नार्वेकर, यश पाटील, निवृत्ती पाटील, मल्हार पाटील, दिग्विजय रायकर, क्षितिज पाटील, आसावरी सावंत, कार्तिकी सावंत व मोठे बारवे येथील युवकांनी सहभाग घेतला. जान्हवी पाटील हिच्या शिवप्रेरणा मंत्राने दीपोत्सव सोहळ्याची सांगता झाली.
No comments: