उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आबा कांबळे यांचे उपोषणाची घेतली दखल. डोंगरांना लागणाऱ्या आगीची चौकशी होणार. उपोषण स्थगित
उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आबा कांबळे यांचे उपोषणाची घेतली दखल.
डोंगरांना लागणाऱ्या आगीची चौकशी होणार.
उपोषण स्थगित.
---------------------
काटेभोगांव प्रतिनिधी
बबन खाटांगळेकर
------+-------------
काटेभोगांव :- बाबा रेडीकर गो गीता सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र ग्रामदान बोर्डाचे माजी अध्यक्ष ,महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचे माजी अध्यक्ष सर्वोदय नेते आबा कांबळे यांनी बाबा रेडीकर गो गीता सेवा संस्थेला सरकार हक्कातील जमीन भाडे तत्त्वावर मिळावी तसेच डोंगरांना आगी लावून चारा जाळणे जैवविविधतेचा, पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी उप वनाधिकारी कोल्हापूर व जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचेकडे करण्यात आली होती. जिल्हाधिकारी व जिल्हा वनाधिकारी यांचे कडून कोणतीच कारवाई होत नव्हती. म्हणून आबा कांबळे यांनी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी १४ एप्रिल २०२६ पासून चेरलपुरी काटेभोगाव तामजाई पठारावरील गोशाळेच्या प्रांगणात उपोषणाला सुरुवात केली. १३ तारखेच्या रात्रीच्या भोजनानंतर उपोषणाला सुरुवात झाली. १४ तारखेला सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्ध वंदना, त्रिशरण, पंचशील आणि सर्वधर्म प्रार्थना करून उपोषण स्थळी बसले. १४ तारखेच्या सायंकाळी चार वाजेपर्यंत या उपोषणाची दखल कोणत्याच शासकीय अधिकाऱ्यांनी घेतली नाही. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ही बाब शासकीय यंत्रणेच्या ११२ नंबर ला फोन करून कळविली आणि सर्वच शासकीय अधिकारी सायंकाळी पाच नंतर उपोषण स्थळी येऊ लागले. आबा आपल्या उपोषणावर ठाम होते. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी सरकार हक्कातील जमीन भाडेतत्त्वावर देता येते की नाही? ते त्यांच्या अधिकारात नसेल तर तसेच सांगावे.देता असेल तर देण्याची कार्यवाही करतो असे सांगावे इतकीच मागणी होती. पण त्यांच्याकडून ते मिळत नव्हते. फॉरेस्टचे बाजारभोगांव बीटचे अधिकारी रसाळ आले पण त्यांनी कारवाई करण्याचे संबंधी काही निर्णय घेतला नाही. उपोषण सुरूच राहिले. १५ तारखेला सायंकाळी पाच वाजता महसूल विभागाचे मंडल निरीक्षक नलिनी मोहिते यांनी आपण जमिनीच्या संदर्भात योग्य ती कार्यवाही करू असे जिल्हाधिकारी यांचे वतीने लेखी पत्र दिले. दरम्यान च्या काळात संस्थेचे हितचिंतक सामाजिक कार्यकर्ते समता सैनिक दलाचे अखिल भारत सचिव डॉक्टर जी. बी. राजे यांनी ही बाब नामदार देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री, तसेच नामदार गणेश जी नाईक वनमंत्री महाराष्ट्र यांना मेल वरती दिली. तातडीने वन मंत्रालयाचे सचिव मिलिंद म्हैसकर यांना पुढील चौकशी करण्यासंबंधी उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे यांनी आदेश दिले व तसेच सत्वर उलट टपाली कळवले. दरम्यान करवीर पन्हाळा बावडा आमदार माननीय चंद्रदीप नरके साहेब यांनी आपण स्वतः या कामी लक्ष घालून जमीन संस्थेला मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू असे दूरध्वनी वरून कळवले व उपोषण स्थगित करण्याची विनंती आबा कांबळे यांना केली. उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे आणि आमदार चंद्रदीप नरके साहेब यांच्या तत्परतेचा आदरपूर्वक सन्मान राखून ३० एप्रिल २०२६ पर्यंत फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी जंगल जाळणाऱ्यांची नावे निष्पन्न करून गुन्हे दाखल करावेत अन्यथा एक मेपासून परत सत्याग्रह करावा लागेल असा इशारा दिला आहे. कळे पोलीस उपनिरीक्षक कदम साहेब यांनी उपोषण कर्ते आबा कांबळे यांना संरक्षण दिले व आरोग्य अधिकाऱ्यांकडून वारंवार त्यांच्या आरोग्याच्या तपासण्या करून घेतल्या. कळे पोलीस ठाण्याचे निरीक्षक कदम साहेब यांचे हस्ते सरबत घेऊन आबांनी उपोषण स्थगित केले. हा विजय लोकशाही संविधानाचा आहे अशी भावना आबांनी अखेर व्यक्त केली.

No comments: