अमरावती रेल्वे उड्डाणपुलासाठी १७ कोटींच्या निधीला मुख्यमंत्र्यांची मंजुरी : आमदार रवी राणा यांचा दावा.आमदार संजय खोडके यांच्या लक्षवेधीवर शनिवारी विधिमंडळात चर्चा.
अमरावती रेल्वे उड्डाणपुलासाठी १७ कोटींच्या निधीला मुख्यमंत्र्यांची मंजुरी : आमदार रवी राणा यांचा दावा.आमदार संजय खोडके यांच्या लक्षवेधीवर शनिवारी विधिमंडळात चर्चा.
------------------------------------
अमरावती प्रतिनिधी
पी. एन. देशमुख
------------------------------------
अमरावती शहरातील राजकमल चौक व जस्तंभ चौकातून रेल्वे स्टेशन आणि हमालपुरा परिसराला जोडणारा जुना रेल्वे उड्डाणपूल २४ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या धोकादायक पुलाच्या पुनर्निर्माणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असल्याचा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे.
बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी या पुलाच्या पुनर्निर्माणासाठी यापूर्वी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १७ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत उर्वरित निधी तातडीने मंजूर करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, विधान परिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते संजय खोडके यांनी याच विषयावर लक्षवेधी सूचना मांडली असून, या लक्षवेधीवर शनिवारी १३ डिसेंबर रोजी विधिमंडळात चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पुलाच्या बंदमुळे शहरातील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाल्याने त्यांनी तात्काळ जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन पर्यायी मार्गांवर भर दिला होता.
सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीसाठी किमान २०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचा आराखडा तयार केला असून, यामध्ये राज्य व केंद्र सरकारचा संयुक्त वाटा असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जुना पूल अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत पोहोचल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, राजकमल येथील हा रेल्वे ब्रिज देशाचे पहिले कृषिमंत्री व अमरावतीचे तत्कालीन खासदार डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रयत्नातून अस्तित्वात आला होता. १२ मार्च १९६३ रोजी लोकसभेत त्यांनी अमरावती व बडनेरा येथील रेल्वे पुलासंदर्भात प्रश्न उपस्थित करत, पुलाच्या तातडीच्या बांधकामासह अमरावती येथे स्वतंत्र रेल्वे स्थानक उभारण्याची मागणी केली होती. बडनेरा येथील अरुंद रेल्वे पुलामुळे शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणी त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या.
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यावर वीर उत्तमराव मोहिते यांनी लिहिलेल्या ग्रंथात या संदर्भातील उल्लेख असल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थशास्त्र संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. महेंद्र मोठे यांनी दिली आहे.

No comments: