भातकुली पोलिसांची अवैध धंद्यावर धडक कारवाई सुरूच देशी दारू वाहतूक करणारा इसम पकडला; ६८,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.
भातकुली पोलिसांची अवैध धंद्यावर धडक कारवाई सुरूच
देशी दारू वाहतूक करणारा इसम पकडला; ६८,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.
भातकुली | प्रतिनिधी (अमरावती)
भातकुली पोलिसांनी अवैध दारू व्यवसायावर धडक कारवाईचे सत्र सुरू ठेवत मोठी कारवाई केली आहे. दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी भातकुली पोलीस ठाण्यास गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, आसरा येथील विमल देशी दारू दुकानातून एक इसम मोटारसायकलवर देशी दारूचा साठा घेऊन इंदापूर मार्गे गणोजा देवी येथे वाहतूक करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गणोजा देवी बस स्टॉप, इंदापूर रोड येथे पोलीस पथकाने नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान संशयित मोटारसायकल चालकास थांबवून तपासणी केली असता, त्याच्या ताब्यातील नायलॉन पोत्यात देशी दारूचे दोन बॉक्स आढळून आले. या बॉक्समध्ये १८० मिली क्षमतेच्या देशी दारूच्या ९६ नग, ज्याची किंमत ९,६०० रुपये आहे, असा साठा मिळून आला.
याशिवाय, होंडा शाईन कंपनीची मोटारसायकल (क्रमांक MH-BM-4026) किंमत अंदाजे ५०,००० रुपये, तसेच रेडमी कंपनीचा मोबाईल फोन किंमत ९,००० रुपये, असा एकूण ६८,६०० रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५ (ई), ७७ (अ) तसेच मोटार वाहन कायदा कलम ३(१), १८१, १३०/१७७ अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असलेले देशी दारू दुकान मालक आशिष मोहोड तसेच दारू विक्रेता भाऊराव खडसे यांचा शोध सुरू असून त्यांना अटक/समजपत्र देणे बाकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे (परिमंडळ-२), सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे (राजापेठ विभाग, अमरावती) आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र राजुलवार (पोलीस स्टेशन भातकुली) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस हवालदार प्रशांत यादव तसेच पोलीस शिपाई सचिन फुंदे, अमोल निचत, प्रवीण हाडोळे, रवी खडसे, धम्मा गजभिये आदींचा सहभाग होता.
भातकुली पोलिसांची अवैध दारू व्यवसायाविरोधातील कारवाई पुढेही सुरूच राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

No comments: