Header Ads

अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव २० ते २५ जणांच्या टोळीचा धुडगूस, दुचाकी-कारची तोडफोड; १० जण ताब्यात.

 अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव

२० ते २५ जणांच्या टोळीचा धुडगूस, दुचाकी-कारची तोडफोड; १० जण ताब्यात.

-----------------------

अमरावती | प्रतिनिधी

पी एन देशमुख 

-----------------

अमरावती शहरात १९ वर्षीय तरुणाच्या निर्घृण हत्येनंतर शुक्रवारी रात्री शहरातील अनेक भागांत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. २० ते २५ जणांच्या टोळीने चाकूचा धाक दाखवत दहशत माजवली, वाहनांची तोडफोड केली तसेच दुकाने जबरदस्तीने बंद करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी १० जणांना ताब्यात घेतले आहे.

नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाळकी डॅम परिसरात शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मंथन पालनकर (वय १९) या तरुणाची चार हल्लेखोरांनी चाकूने भोसकून हत्या केली. मंथन याच्यावर यापूर्वी गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या हत्येप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी शुक्रवारी रात्री गोपाल नगर परिसरातील तीन आरोपींना ताब्यात घेतले.

या कारवाईनंतर रात्री साडेआठच्या सुमारास मृत तरुणाच्या समर्थकांची असल्याचे सांगण्यात येणाऱ्या २० ते २५ जणांच्या टोळीने प्रथम केडिया नगर, त्यानंतर आदिवासी नगर, शंकर नगर व गोपाल नगर परिसरात धुडगूस घातला. टोळीने चाकूचा धाक दाखवत दहशत निर्माण केली.

शंकर नगर, राजापेठ व नवा भागात काही दुकानांमध्ये घुसून दुकाने बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

शंकर नगरमधील गोल्ड जिम परिसरात दोन कारची तोडफोड करण्यात आली, तर पुढे शंकर नगर भागात काही दुचाकींचेही नुकसान झाले. आदिवासी नगर भागात काही घरांवर दगडफेक झाल्याचीही माहिती समोर आली आहे.

दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या तीन हल्लेखोरांमध्ये आरोपीच्या समर्थकांचाही समावेश असल्याचे काहींचे म्हणणे आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

या घटनेनंतर राजापेठ पोलीस ठाण्याचे ठाणेदार पुनीत कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दहशत माजवणाऱ्या टोळीतील १० जणांना ताब्यात घेतले आहे. अचानक घडलेल्या प्रकारामुळे शंकर नगर, आदिवासी नगर, केडिया नगर व गोपाल नगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. अनेक नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने घरांची दारे बंद ठेवली होती. रात्री दहाच्या सुमारास परिस्थिती नियंत्रणात आली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त श्याम घुगे तसेच सहायक पोलीस आयुक्त संजय खताळे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच आमदार रवी राणा यांनीही गोल्ड जिम परिसरातील घटनास्थळाला भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून शहरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

No comments:

Powered by Blogger.