Header Ads

उमळवाड–उदगांव परिसरात लाल माती उत्खननाला वेग — ग्रामस्थांचा प्रशासन मात्र निष्क्रिय.

 उमळवाड–उदगांव परिसरात लाल माती उत्खननाला वेग — ग्रामस्थांचा  प्रशासन मात्र निष्क्रिय.

-----------------------------

जयसिंगपूर / प्रतिनिधी : नामदेव भोसले.

-------------------------------

शिरोळ तालुक्यातील उमळवाड  नदीकाठावर मोठ्या प्रमाणात लाल मातीचे अवैध उत्खनन सुरू असून यामागे महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांचे मौन आशिर्वाद असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रामस्थांनी तहसील कार्यालय, शिरोळ तसेच तलाठी व मंडल अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या तरीही उत्खननावर कुठलीही ठोस कारवाई होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, लाल माती तस्कर “आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही” असा संदेश देत दिवसाढवळ्या गौण खनिजांची उघडपणे लूट करत आहेत. शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत नदीकिनारी खोदकामाच्या माध्यमातून 50 ते 150 फूट खोल खड्डे पाडले जात आहेत. या खड्ड्यांमुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

उमळवाड परिसरात काही माती ठेकेदार शासनाला रॉयल्टी न भरता स्वतःच्या मालकीच्या रुबाबात जेसीबीच्या सहाय्याने माती उपसा करत असून, ती ट्रॅक्टर व डंपरमधून दररोज वाहतूक केली जात आहे. तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना सर्व माहिती असूनही कारवाई होत नाही, यामागील गौडबंगाल काय आहे हे जनतेला समजत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.

रिव्हरपात्राजवळील लाल मातीच्या अवैध उत्खननामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. उत्खननानंतर खड्डे जसेच्या तसे राहतात, भरून निघत नाहीत. पूर्वी पुराच्या पाण्यामुळे गाळ साचून खड्डे आपोआप भरत असत; मात्र आता पुराचे प्रमाण घटल्याने हे खड्डे कायम खुले राहून नदीकाठी मोठा धोका निर्माण होत आहे. याशिवाय , परंतु याकडे शासकीय विभाग दुर्लक्ष करीत आहे.

ग्रामस्थांनी गावपंचायतीने लाल माती काढण्यावर तात्काळ बंदी घालावी, तसेच प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून अवैध लाल माती उत्खननावर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. अवैध उत्खनन थांबले नाही तर नदीचा मार्ग बदलण्याचा धोका निर्माण होऊन भविष्यात मोठी आपत्ती ओढवू शकते, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

No comments:

Powered by Blogger.