शिरढोण ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थांचे उपोषण; चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे.
शिरढोण ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थांचे उपोषण; चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे.
----------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
संस्कार कुंभार
----------------------------------
कोल्हापूर : शिरढोण (ता.शिरोळ)येथील ग्रामपंचायतीत झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात आज ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करत उपोषण केले. ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत अनेक दिवसांपासून ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. याआधी झालेल्या गावसभेत ग्रामस्थांनी सरपंच, ग्रामसेवक व सदस्यांना जाब विचारत जाहीरपणे धारेवर धरले होते.मात्र ठोस कारवाई न झाल्याने आज शिरढोण गावात उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात आला.या उपोषणात सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालीघाटे, सुरेश सासणे व अविनाश पाटील यांनी ग्रामपंचायतीत विकासकामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला.निधीचा गैरवापर,कामांची निकृष्ट दर्जाची अंमलबजावणी तसेच कागदोपत्री कामे दाखवून रक्कम लाटल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
उपोषणाची माहिती मिळताच गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.त्यांच्या सूचनेनुसार विस्तार अधिकारी रवि कांबळे यांनी आंदोलनस्थळी भेट देत ग्रामस्थांशी चर्चा केली. ग्रामपंचायतीतील सर्व विभागनिहाय कामांची सखोल चौकशी करण्यात येईल तसेच दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल,असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले.
प्रशासनाकडून चौकशीचे ठोस आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन व उपोषण मागे घेतले.या आंदोलनात पोपट पुजारी,प्रशांत कूगे,सुकुमार पुजारी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.मात्र,चौकशी केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष कारवाई व्हावी, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन छेडले जाईल,असा इशाराही ग्रामस्थांनी यावेळी दिला आहे.

No comments: