कास पठाराजवळ अज्ञात व्यक्तीचा गळफास; परिसरात खळबळ
कास पठाराजवळ अज्ञात व्यक्तीचा गळफास; परिसरात खळबळ.
सातारा जिल्हा प्रतिनिधी : अमर इंदलकर
जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळख असलेल्या कास पठाराच्या नजीक आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली असून, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कास पठाराच्या मुख्य कार्यालयासमोर, छोटा धबधबा कोसळतो त्या परिसरात झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत ही व्यक्ती आढळून आली.
आज सकाळच्या सुमारास त्या मार्गाने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी तत्काळ कास पठारावरील सुरक्षेसाठी असलेल्या कास समितीच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता संबंधित व्यक्ती झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यानंतर ही माहिती मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना देण्यात आली.
मृत व्यक्तीच्या अंगावर पांढरा सदरा, खाकी रंगाची नाईट पँट, कानाला काळी टोपी असून पायात सॉक्स व स्लीपर असल्याचे आढळून आले आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून वय व इतर तपशीलांबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
माहिती मिळताच मेढा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवली जात आहे. पर्यटकांची मोठी वर्दळ असलेल्या कास पठार परिसरात घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून, मृताची ओळख पटवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. पुढील तपास मेढा पोलीस करत आहेत.

No comments: