लोकांचे जागेवर काम होऊन समाधान मिळावे हेच ‘समाधान शिबिरा’चे उद्दिष्ट : प्रांताधिकारी समीर शिंगटे
लोकांचे जागेवर काम होऊन समाधान मिळावे हेच ‘समाधान शिबिरा’चे उद्दिष्ट : प्रांताधिकारी समीर शिंगटे
--------------------------------
मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते:
-----------------------------------
शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी तसेच समाजातील सर्व घटकांची विविध विभागांशी संबंधित कामे एकाच छताखाली जागेवरच पूर्ण होऊन त्यांना समाधान मिळावे, या उद्देशाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ आयोजित करण्यात येत असल्याचे प्रतिपादन पन्हाळा विभागाचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी केले.
शाहूवाडी येथील संकल्प सिद्धी हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी तहसीलदार सीमा सोनवणे यांनी स्वागत व प्रास्ताविक करत अभियानाची उद्दिष्टे व विविध योजनांची माहिती देत उपस्थितांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी पुढे बोलताना प्रांताधिकारी शिंगटे म्हणाले की, या अभियानांतर्गत सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी यांच्यासह सर्वच घटकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रत्येक मंडल स्तरावर समाधान शिबिरे आयोजित केली जात आहेत. एप्रिल व मे महिन्यातही ही शिबिरे होणार असून नागरिकांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. जनतेच्या हितासाठीच हे अभियान राबविण्यात येत असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे.
या शिबिरात महसूल, कृषी, आरोग्य व पंचायत समिती या विभागांमार्फत एकूण १५८६ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.
यावेळी मुद्रांक अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य स्नेहल वेल्हाळ, उपसभापती अमर खोत यांनीही मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमास गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार, कृषी अधिकारी नीलम चाकणे, मंडलाधिकारी आदित्य दाभाडे, सहायक महसूल अधिकारी विश्वास डोंगरे, विस्तार अधिकारी पराग कानडे, पर्यवेक्षिका अश्विनी पाटील, राणी पाटील तसेच विस्तार अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, विद्यार्थी, शेतकरी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: