मोरजाई यात्रेच्या दिवशी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची बोरबेट येथे प्रत्यक्ष पाहणी तालुका आरोग्य विभागाच्या उत्कृष्ट नियोजनाचे केले विशेष कौतुक.
मोरजाई यात्रेच्या दिवशी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची बोरबेट येथे प्रत्यक्ष पाहणी
तालुका आरोग्य विभागाच्या उत्कृष्ट नियोजनाचे केले विशेष कौतुक.
---------------
कळे प्रतिनिधी
सुनिल मोळे
----------------
गगनबावडा तालुक्यातील दुर्गम, डोंगराळ आणि अतिशय अवघड भौगोलिक परिस्थिती असलेल्या बोरबेट येथे भरविण्यात येणाऱ्या प्रसिद्ध श्री मोरजाई देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी यात्रेच्या दिवशी प्रत्यक्ष भेट देत आरोग्य व्यवस्थेची सखोल पाहणी केली. यात्रेच्या काळात होणारी भाविकांची मोठी गर्दी, आपत्कालीन परिस्थिती आणि आरोग्यविषयक संभाव्य अडचणी लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून नियोजनाचा आढावा घेतल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा बळ मिळाले आहे.
मोरजाई देवीच्या यात्रेसाठी राज्याच्या विविध भागांतून तसेच दुर्गम परिसरातून हजारो भाविक बोरबेट येथे दाखल होतात. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी गगनबावडा तालुका आरोग्य विभागाच्या वतीने चोख आणि काटेकोर नियोजन करण्यात आले होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विशाल चोकाककर यांनी यात्रेपूर्वी केलेली तयारी, मनुष्यबळाचे योग्य नियोजन, औषधसाठा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि तत्पर यंत्रणा याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पिंपळे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी डॉ. चोकाककर व त्यांच्या संपूर्ण पथकाचे विशेष अभिनंदन केले.
जिल्हा व स्थानिक प्रशासनाची भरीव उपस्थिती
या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हा प्रशासन अधिकारी डॉ. अजयकुमार गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी आरोग्य उपकेंद्रातील कार्यपद्धती, उपलब्ध वैद्यकीय साधनसामग्री, औषधसाठा तसेच रुग्णवाहिका सेवांची माहिती घेतली.
यासोबतच प्राथमिक आरोग्य केंद्र गारीवडे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. नवनाथ बोचरे, डॉ. आकाश बांगर यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांचे संपूर्ण पथक यात्रेकरूंच्या सेवेसाठी बोरबेट येथे तैनात करण्यात आले होते. या पथकाच्या तत्परतेची आणि कार्यक्षमतेची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रशंसा केली.
दुर्गम भागातील आरोग्य सेवेचे कौतुक
डोंगराळ, वाहतुकीच्या मर्यादित सुविधा असलेल्या आणि सेवासुविधांपासून काहीशा वंचित असलेल्या या भागात आरोग्य कर्मचारी जिद्द, चिकाटी आणि जबाबदारीने सेवा देत असल्याबद्दल डॉ. पिंपळे यांनी समाधान व्यक्त केले. यात्रेच्या गर्दीत कोणत्याही भाविकाला आरोग्यविषयक अडचण भासू नये, यासाठी त्यांनी उपस्थित डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना दिल्या. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ उपचार देण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
"जनतेतून समाधान"
जिल्ह्याच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी स्वतः यात्रेच्या दिवशी दुर्गम अशा बोरबेट गावाला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेवर लक्ष ठेवल्याने स्थानिक ग्रामस्थ, भाविक आणि यात्रेकरूंमधून प्रशासनाबद्दल समाधान आणि विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या दौऱ्यामुळे गगनबावडा तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचा आत्मविश्वास दुणावला असून भविष्यातील मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठीही ही व्यवस्था आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
उपस्थित मान्यवर व कर्मचारी
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. नवनाथ बोचरे, डॉ. आकाश बांगर,डॉ. कुंभार, विस्तार अधिकारी, सर्व समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक व सहायिका, वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक व सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वाहन चालक व परिचर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: