Header Ads

जयश्री शेवते यांच्या वाढत्या पाठिंब्याने विरोधकांमध्ये खळबळ प्रस्थापितांच्या विरोधात कुडाळ गटात परिवर्तनाची जोरदार लाट

 जयश्री शेवते यांच्या वाढत्या पाठिंब्याने विरोधकांमध्ये खळबळ

प्रस्थापितांच्या विरोधात कुडाळ गटात परिवर्तनाची जोरदार लाट.

----------------------------

प्रतिनिधी/ शेखर जाधव .

----------------------------


सातारा/ जावली  : कुडाळ जिल्हा परिषद गटातील राजकारण सध्या निर्णायक वळणावर येऊन ठेपले असून, अपक्ष उमेदवार सौ. जयश्री शेवते यांच्या वाढत्या जनसमर्थनामुळे विरोधी गोटात चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय शेवते यांच्या पत्नी आणि युवा नेते दीपक शेवते यांच्या मातोश्री असलेल्या जयश्री शेवते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करताच कुडाळ गटातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत.

भाजप पक्षाकडून निष्ठावंत व कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याने कुडाळ जिल्हा परिषद मतदारसंघात तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे. या असंतोषाचेच प्रतिबिंब म्हणून गावोगावी जयश्री शेवते यांना मिळणारा उत्स्फूर्त पाठिंबा विरोधकांची झोप उडवणारा ठरत आहे. परिणामी, कुडाळ गटात प्रस्थापित सत्तेविरोधात परिवर्तनाची लाट उभी राहिली असल्याचे चित्र आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ गटात प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, या शर्यतीत अपक्ष उमेदवार जयश्री शेवते यांनी ठळक आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या घडीला त्यांचे पारडेच जड असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

ग्रामीण भागातून सक्षम, विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून जयश्री शेवते या आधीपासूनच प्रमुख दावेदार मानल्या जात होत्या. शेतकरी, महिला, युवक तसेच सर्वसामान्य घटकांसाठी त्यांनी राबवलेले जनहिताचे विविध उपक्रम हे त्यांच्या कार्याची ठोस साक्ष आहेत. सामाजिक न्यायाला प्राधान्य देत सातत्याने काम करण्याची त्यांची भूमिका मतदारांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरत आहे.

जयश्री शेवते यांच्या सभोवती युवकांचा वाढता गराडा, महिलांची मोठी उपस्थिती तसेच ज्येष्ठांचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभत असल्याने त्यांचा प्रचार अधिक बळकट होत आहे. जनतेच्या आग्रहाखातर आणि अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी त्यांनी कुडाळ जिल्हा परिषद गटातून अपक्ष उमेदवारी स्वीकारत दंड थोपटले आहेत.

सर्वांगीण विकास, शासकीय योजनांचा तळागाळापर्यंत लाभ आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जयश्री शेवते यांनी धडाकेबाज प्रचाराचा शुभारंभ केला असून, त्यांना ठिकठिकाणी मिळणारा प्रचंड प्रतिसाद विरोधी उमेदवारांसाठी धडकी भरवणारा ठरत आहे. माता-भगिनींचा वाढता पाठिंबा आणि जनतेचा आशीर्वाद पाहता कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

सध्या जयश्री शेवते यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी गावोगावी जाऊन प्रचार करत असून, मोठ्या मताधिक्याने विजय मिळवण्यासाठी जीवाचे रान करताना दिसत आहेत. त्यामुळे जयश्री शेवते या मोठ्या फरकाने विजयी होतील, असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.



चौकट :

“मी कुडाळ गटातील सर्व मतदारांना नम्र विनंती करते की, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता, पक्ष–गट न पाहता कुडाळ गटाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया. आपल्या मतांचे विभाजन व्हावे यासाठी विरोधकांकडून प्रयत्न सुरू आहेत. कोणत्याही परिस्थितीत मते विभागली जाऊ देऊ नयेत, यासाठी कुडाळकरांनी मला साथ द्यावी.”

— सौ. जयश्री शेवते, अपक्ष उमेदवार

No comments:

Powered by Blogger.