Header Ads

यात्रेत पोलिसांची मुजोरी; भाविकांना त्रास, कारवाईची मागणी.

यात्रेत पोलिसांची मुजोरी; भाविकांना त्रास, कारवाईची मागणी.

--------------------------------------

सातारा जिल्हा प्रतिनिधी 

अमर इंदलकर

--------------------------------------

सातारा जिल्ह्यातील वर्णे-आबापुरी येथे दरवर्षीप्रमाणे काळभैरवनाथाची भव्य यात्रा भरली होती. या यात्रेसाठी हजारो भाविक मोठ्या भक्तीभावाने देवदर्शनासाठी येत असतात. मात्र यावर्षी यात्रेच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या काही पोलिसांच्या मुजोर वर्तनामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळल्याची घटना समोर आली आहे.

यात्रेच्या काळात वाहतुकीची कोंडी होऊ नये व भाविकांना सुरळीतपणे देवदर्शन करता यावे यासाठी पोलिसांना बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले होते. परंतु कर्तव्य बजावताना काही पोलिसांनी सामाजिक बांधिलकी, सौजन्यशीलता आणि संयम राखण्याऐवजी भाविकांशी उद्धटपणे वागल्याचा आरोप करण्यात येत आहे.

देवदर्शनासाठी आलेल्या वृद्ध महिला-पुरुष, अपंग व्यक्ती तसेच तातडीच्या आरोग्य सेवेसाठी जाणाऱ्या वाहनांना देखील अडवून ठेवण्यात आले. एवढेच नव्हे तर बातमी कव्हर करण्यासाठी आलेल्या पत्रकारांनाही अडथळा आणल्याचे सांगण्यात येत आहे. देवस्थान ट्रस्टच्या काही विश्वस्तांनाही पोलिसांच्या कठोर वर्तनाला सामोरे जावे लागल्याची चर्चा यात्रास्थळी होती.

यामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून “भाविकांची सेवा करण्याऐवजी पोलिसांची मुजोरी का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. यात्रेसारख्या धार्मिक कार्यक्रमात नागरिकांशी आदराने वागण्याऐवजी पोलिसांनी केलेल्या कथित गैरवर्तनाची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, तसेच त्यांना निलंबित करावे अशी मागणी भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, या घटनेची दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेऊन चौकशी करून दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. यात्रेच्या पवित्र वातावरणात घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासनाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

No comments:

Powered by Blogger.