Header Ads

जिजाऊ ब्रिगेडतर्फे कळंब्यात विधवा महिलांचा सन्मान सोहळा संपन्न.

 जिजाऊ ब्रिगेडतर्फे कळंब्यात विधवा महिलांचा सन्मान सोहळा संपन्न.

--------------------------------- 

कोल्हापूर  प्रतिनिधी  

संजय कुंभार

--------------------------------- 

कोल्हापूर: मकर संक्रांतीच्या निमित्ताने समाजात वर्षानुवर्षे चालत आलेल्या जुन्या रूढी-परंपरांना छेद देत, जिजाऊ ब्रिगेड कळंबा शाखेच्या वतीने 'विधवा महिलांसाठी विशेष हळदी-कुंकू' समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. प्रवक्त्या रंजना पाटील यांच्या नियोजनातून गेली अनेक वर्षांपासून हा स्तुत्य उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.

 सामान्यतः संक्रांतीच्या काळात हळदी-कुंकवाचा मान केवळ 'सौभाग्यवती' महिलांनाच दिला जातो. यामुळे विधवा महिलांच्या मनात उपेक्षितपणाची भावना निर्माण होते. या टिकेला आणि सामाजिक विषमतेला उत्तर देण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडने हा आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, उपस्थित विधवा महिलांच्या हस्तेच महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

या उपक्रमाबाबत बोलताना रंजना पाटील म्हणाल्या की, "केवळ नटून-थटून वाण लुटणे म्हणजे सक्षमीकरण नव्हे. जेव्हा विधवा आणि घटस्फोटीत स्त्रियांना समाजात समानतेचा दर्जा आणि मान-सन्मान मिळेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण झाले असे म्हणता येईल. परिवर्तनाचा हा विचार आम्ही समाजात रुजवत आहोत आणि आनंद आहे की आता अनेक ठिकाणी याचे अनुकरण होत आहे."

गृहपयोगी वस्तूंचे वाटप

या सोहळ्यात सहभागी झालेल्या विधवा महिलांना सन्मानपूर्वक बोलावून त्यांना गृहपयोगी वस्तू आणि खाऊ भेट म्हणून देण्यात आला. महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद हा या कार्यक्रमाचे यश असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष चारुशीला पाटील यांच्यासह सुमन वागळे, दिपाताई कोकाटे, कल्पना देसाई, प्राजक्ता आमले, विनिता निंबाळकर, अनुपमा चव्हाण या जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी आणि भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

No comments:

Powered by Blogger.