साताऱ्यात सराईत टोळीवर मोठी कारवाई; चार गुन्हेगार तडीपार.
साताऱ्यात सराईत टोळीवर मोठी कारवाई; चार गुन्हेगार तडीपार.
--------------------------------
सातारा प्रतिनिधी
अमर इंदलकर
--------------------------------
सातारा शहरातील शाहूपुरी परिसरात सातत्याने गंभीर गुन्हे करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत टोळीविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई करत चार गुन्हेगारांना सातारा, सांगली, पुणे व कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.
तडीपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये टोळी प्रमुख प्रेम गणेश पवार (वय २१, रा. शुक्रवार पेठ, सातारा) तसेच टोळी सदस्य आनंदा ऊर्फ आण्णा लक्ष्मण माने (वय २०, रा. जिव्हाळा कॉलनी, दिव्यनगरी, सातारा), प्रेम आबासाहेब अडागळे (वय २१, रा. हिंदवी पब्लिक स्कूल जवळ, कुलकर्णी कॉलनी, शाहूपुरी, सातारा) आणि अनिकेत सोमनाथ अहिवळे (वय २०, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांचा समावेश आहे.
या टोळीविरुद्ध दरोडा, मारामारी, दुखापत करणे, दमदाटी, शिवीगाळ, बेकायदेशीर जमाव जमवणे, मालमत्ता हिसकावून घेणे यांसारख्या गंभीर स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे दाखल होते. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही या टोळीने आपले गुन्हेगारी कृत्य सुरूच ठेवले होते. त्यामुळे सातारा तालुका परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता.
शाहूपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. एस. जी. म्हेत्रे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अंतर्गत सदर टोळीविरुद्ध तडीपार कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी सदर चारही आरोपींना दोन वर्षांसाठी सातारा, सांगली, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करण्याचे आदेश दिले.
पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी आगामी निवडणूक काळात गुन्हेगारीविरोधात कडक भूमिका घेणार असल्याचे सांगत, सराईत गुन्हेगारांवर मोक्का व एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
या कारवाईसाठी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजू कांबळे, शिवाजी भिसे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अनुराधा सणस, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे महेश बोडरे, अब्दुल खलिफा, कॉन्स्टेबल केतन शिंदे, शुभम चव्हाण यांनी पुरावे सादर करून महत्त्वाची भूमिका बजावली.

No comments: