🌳 नांदगाव जंगलात थरार! मध्यरात्री शिकाऱ्यांचा कट उधळला.
🌳 नांदगाव जंगलात थरार! मध्यरात्री शिकाऱ्यांचा कट उधळला.
🔫 पेंडाखळे वनविभागाची धडाकेबाज कारवाई; तिघे शिकारी रंगेहाथ जेरबंद
🦌 देशी बनावटीची बंदूक जप्त; वन्यजीव थोडक्यात बचावले
बाजारभोगाव / प्रतिनिधी
नांदगाव (ता. शाहूवाडी) परिसरातील घुंगूर–पिशवी रस्त्यालगतच्या घनदाट जंगलात मध्यरात्री शिकाऱ्यांनी रचलेला घातक डाव पेंडाखळे वनविभागाच्या सतर्क पथकाने अक्षरशः उधळून लावला. सोमवारी रात्रीच्या अंधारात जंगलात चमकणाऱ्या बॅटरीच्या क्षीण प्रकाशाने वनकर्मचाऱ्यांना संशय आला आणि याच एका क्षणाने मोठा अनर्थ टळला.
क्षणाचाही विलंब न करता वनपथकाने जंगलात शिरून जीव धोक्यात घालून पाठलाग केला आणि शिकारीच्या तयारीत असलेल्या तिघांना रंगेहाथ पकडले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सर्वजीत विष्णू खोत, संजय बाळू खोत आणि विठ्ठल श्रीपती खोत (सर्व रा. खोतवाडी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) अशी आहेत.
आरोपींकडून देशी बनावटीची विनापरवाना बंदूक, बॅटऱ्या व शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. वनविभागाच्या माहितीनुसार, कारवाई काही वेळ उशिरा झाली असती, तर जंगलातील एखादे निरपराध वन्यजीव नक्कीच शिकाऱ्यांच्या गोळीचा बळी ठरले असते.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना प्रथम वर्ग न्यायालय, कळे–खेडीवडे येथे हजर केले असता न्यायालयाने दि. १७ पर्यंत वनकोठडी सुनावली आहे. पुढील तपास वेगाने सुरू आहे.
ही धडक कारवाई उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक वनसंरक्षक व्ही. आर. काळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. तपास अधिकारी सुषमा जाधव, वनपाल मधुकर जासूद, वनरक्षक काजल बाळू गावडे, निलेश साठे, ज्ञानेश्वर शिंदे, अनिकेत पाटील, अतुल कदम, रोहिदास गरजे व वनमजुरांनी प्रचंड धाडस दाखवत ही कारवाई यशस्वी केली.
आज नांदगावच्या कुशीत वसलेले जंगल सुरक्षित आहे, कारण कुणीतरी रात्री जागं होतं.
“जंगल वाचेल, तरच वन्यजीव वाचतील… आणि वन्यजीव वाचले, तरच माणूस वाचेल,”
अशा भावना संतप्त पण कृतज्ञ ग्रामस्थांतून व्यक्त होत आहेत.

No comments: