रस्ता सुरक्षा आणि सायबर क्राईमबाबत जागृती हायस्कूल व घाळी कॉलेजमध्ये जनजागृती.
रस्ता सुरक्षा आणि सायबर क्राईमबाबत जागृती हायस्कूल व घाळी कॉलेजमध्ये जनजागृती.
-------------------------------
सलीम शेख
-------------------------------
कोल्हापूर : रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत गडहिंग्लज येथील जागृती हायस्कूल व रत्नमाला घाळी ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी रस्ता सुरक्षा, सायबर गुन्हेगारी आणि सोशल मीडियाचा वापर या विषयांवर विशेष प्रबोधन कार्यक्रम संपन्न झाला. महामार्ग पोलीस केंद्र उजळाईवाडी (कोल्हापूर) यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ए.पी.आय सत्यराज घुले आणि पी.एस.आय प्रदीप जाधव उपस्थित होते. यावेळी ए .पी.आय घुले यांनी उपस्थित ५०० ते ५५० विद्यार्थी-विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की, "वाहतुकीचे नियम केवळ दंडासाठी नसून स्वतःच्या सुरक्षिततेसाठी पाळणे आवश्यक आहे. परवाना (License) असल्याशिवाय वाहन चालवू नये."
अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि अपघातातील जखमींना तातडीने मदत मिळावी यासाठी 'मृत्युंजय दूत' या संकल्पनेची सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांना या सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.सध्याच्या काळात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सावध करण्यात आले. सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर टाळणे, अनोळखी व्यक्तींशी संपर्क न ठेवणे आणि सायबर फसवणूक झाल्यास काय करावे, याबाबत मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस अंमलदार राहुल पाटील यांनी महामार्ग पोलिसांच्या 'इंटरसेप्टर' वाहनाची माहिती दिली. या अत्याधुनिक वाहनाद्वारे वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांवर 'ई-चलन'द्वारे कशी कारवाई केली जाते, हे त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितले.
यावेळी शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींना पोलीस अधिकारी व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

No comments: