महाराष्ट्र ब्रँडच्या बाटल्यांत गोव्याची दारू! कोल्हापुरात १७ लाखांचे बनावट मद्य रॅकेट उघड.
महाराष्ट्र ब्रँडच्या बाटल्यांत गोव्याची दारू! कोल्हापुरात १७ लाखांचे बनावट मद्य रॅकेट उघड.
--------------------------------------
शशिकांत कुंभार
--------------------------------------
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्यात विक्रीस असलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये गोवा राज्यातील मद्य भरून जादा दराने विक्री करणाऱ्या रॅकेटचा राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर जिल्हा अधीक्षक अंतर्गत भरारी पथकाने पर्दाफाश केला.
कारवाईत तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, खास लपवणूक कप्पे (सीक्रेट चेंबर) तयार केलेल्या चारचाकी वाहनांसह १६ लाख ९५ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेच्या काळात, १६ जानेवारी रोजी मतमोजणीच्या दिवशी मिळालेल्या माहितीच्या आधारे शिरोळ तालुक्यातील कोंडीग्रे येथील केन कंपनीसमोरील पत्र्याच्या शेडमध्ये राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर जिल्हा अधीक्षक भरारी पथकाने छापा टाकला.
या ठिकाणी नफा मिळविण्याच्या उद्देशाने गोवा राज्यात विक्रीस असलेले विदेशी मद्य महाराष्ट्रात विक्रीस असलेल्या रिकाम्या बाटल्यांमध्ये पुनर्भरित करून, बनावट बुच लावून जादा दराने विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले. यासोबतच मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांमध्ये नजरेत न येण्यासाठी खास तयार केलेले गुप्त कप्पे (सीक्रेट चेंबर) आढळून आले, ज्यामध्ये मद्य लपवून वाहतूक केली जात होती.
या कारवाईत विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या तसेच पुनर्भरित केलेल्या एकूण ३७५ बाटल्या (१२४.०२ लिटर मद्य) जप्त करण्यात आल्या. याशिवाय सेंट्रो, नेक्सॉन व स्विफ्ट डिझायर ही चारचाकी वाहने, त्यामध्ये तयार केलेले लपवणूक कप्पे, रिकाम्या बाटल्या, बनावट बुच व मोबाईल संच असा एकूण १६,९५,५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई कोल्हापूर जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे, सांगली जिल्हा अधीक्षक प्रदीप पोटे, कोल्हापूर जिल्हा उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क एक्साईज भरारी पथक क्र. १ चे निरीक्षक सदानंद मस्करे, हातकणंगले निरीक्षक महेश गायकवाड, दुय्यम निरीक्षक अभयकुमार साबळे, अजय वाघमारे, सहायक दुय्यम निरीक्षक कांचन सरगर, जवान विलास पवार, सचिन लोंढे, विशाल भोई, धीरज पांढरे, सागर शिंदे, कॉन्स्टेबल सुशांत बनसोडे, अमोल यादव, वाहन चालक साजिद मुल्ला, प्रसाद माळी, तसेच इचलकरंजी व मिरज येथील निरीक्षकांनी सहभाग घेतला.
या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक अभयकुमार साबळे करत आहेत.

No comments: