प्रेमसंबंधाच्या संशयातून खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप वाई न्यायालयाचा निकाल.
प्रेमसंबंधाच्या संशयातून खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप
वाई न्यायालयाचा निकाल.
------------------------अमर इंदलकर .
---------------------
वाई पोलीस ठाणे भाग-५ अंतर्गत दाखल गु.र. नं. 21/2018 (भादंवि कलम 302, 201) या खून प्रकरणात न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
दि. 24 जानेवारी 2018 रोजी सदर गुन्हा दाखल झाला होता. आरोपी रूपेश उर्फ पप्पू शिवाजी चव्हाण (रा. अभेपुरी, ता. वाई) यास त्याची बहिण व मयत अरुण नामदेव मोहिते यांच्यात प्रेमसंबंध असावेत असा संशय होता. या संशयातून मनात राग धरून आरोपीने अरुण मोहिते यास कशाने तरी डोक्यात मारून त्याचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयताचे प्रेत अंगावरील कपड्यांसह कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात फेकून दिले.
या प्रकरणी मयताचा भाऊ अक्षय नामदेव मोहिते याने फिर्याद दिल्याने वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक येडगे यांनी करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.
सदर खटल्याची सुनावणी मा. श्री. आर. एन. मेहरे, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश, वाई यांच्या न्यायालयात झाली. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्री. ए. आर. कुलकर्णी यांनी प्रभावीपणे काम पाहिले. या प्रकरणात एकूण 14 साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावे, प्रत्यक्षदर्शी साक्षी, तसेच सरकारी वकिलांनी सादर केलेल्या ठोस युक्तिवादाच्या आधारे न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवले.
न्यायालयाने आरोपीस भादंवि कलम 302 अंतर्गत जन्मठेप व 25 हजार रुपये दंड, तर कलम 201 अंतर्गत 5 वर्षे सक्तमजुरी व 1 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. यातील 25 हजार रुपयांचा दंड मयताच्या आईस देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या खटल्यात उपविभागीय पोलीस अधिकारी वाई श्री. साळुंखे, पोलीस निरीक्षक श्री. शहाणे व सपोनि येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार कदम (ब. नं. 2008, वाई पोलीस ठाणे) यांनी काम पाहिले. तसेच पोलीस प्रॉसिक्युशन स्कॉडचे स. फौ. डेरे, पोहवा पाम्ब्रे, पोहवा 625 काळे, पो. कॉ. कुंभार (1725), पो. कॉ. कदम (1823), पो. कॉ. नाळे (1685) व पो. कॉ. सकपाळ (783) यांनी मोलाची मदत केली.

No comments: