Header Ads

व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या मागणीला यश

 व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या मागणीला यश*

--------------------------------

जावळा  प्रतिनिधी 

शेखर जाधव  

--------------------------------

पत्रकार कल्याण निधीत २० कोटींची भरीव वाढ – ऐतिहासिक निर्णय.

 मुंबई : राज्यातील पत्रकारांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी असून, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीत राज्य सरकारकडून २० कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य शासनाने नुकताच अधिकृत शासन निर्णय (G.R.) निर्गमित केला आहे.

पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणाऱ्या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ यांच्या मागणीला अखेर यश आले आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या उपोषणामुळे या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले गेले होते. त्यावेळी सरकारकडून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सकारात्मक आश्वासन देण्यात आले होते, आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता शासन निर्णयाच्या माध्यमातून झाली आहे.

यापूर्वी पत्रकार कल्याण निधीसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद होती. सदर निधीत २० कोटींची वाढ करून एकूण निधी १२० कोटी रुपये करण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून राज्यातील अधिस्वीकृतीधारक पत्रकार व ज्येष्ठ पत्रकारांना अपघात, दुर्धर आजार तसेच आकस्मिक मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जाणार आहे.

तसेच, राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांप्रती आदरभाव, कृतज्ञता आणि सामाजिक सुरक्षितता प्रदान करण्याच्या उद्देशाने ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना’ या निधीअंतर्गत राबवली जात आहे. या योजनेत पूर्वी दिले जाणारे ₹11,000 मासिक आर्थिक सहाय्य वाढवून ₹20,000 प्रति महिना करण्यात आले आहे, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.

राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारी संघटना म्हणून व्हॉईस ऑफ मीडिया अग्रभागी राहिली आहे. नागपूर अधिवेशन काळात संघटनेने या मागणीसाठी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. या पूर्वी अनेक वेळा संघटनेने या विषयासाठी आंदोलन आणि उपोषण केले होते.

अखेर शासन निर्णय जाहीर झाल्याने पत्रकार संघटनेच्या मागणीला यश मिळाले असून राज्यातील पत्रकार वर्गात समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे.

No comments:

Powered by Blogger.