Header Ads

नशेली MEPHENTERMINE SULPHATE (मेफनटर्माईन सल्फेट) इंजेक्शन विक्री करणारा इसम अटकेत; १ लाख १२हजारांचा मुद्देमाल जप्त.

 नशेली MEPHENTERMINE SULPHATE (मेफनटर्माईन सल्फेट) इंजेक्शन विक्री करणारा इसम अटकेत; १ लाख १२हजारांचा मुद्देमाल जप्त.

-------------------------------

शशिकांत कुंभार 

------------------------------

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थ व नशिल्या इंजेक्शनच्या बेकायदेशीर विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांनी प्रभावी व धडक कारवाई करत एका इसमास अटक केली आहे. या कारवाईत MEPHENTERMINE SULPHATE या नशिल्या इंजेक्शनसह दुचाकी व मोबाईल असा एकूण १,१२,३९१/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर विक्रीमुळे तरुण वर्ग नशेच्या आहारी जाऊन गुन्हेगारीकडे वळत असल्याच्या पार्श्वभूमीवर, अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्पष्ट आदेश दिले होते.

त्या आदेशांनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी अधिकारी व अंमलदारांची स्वतंत्र पथके तयार करून अंमली पदार्थ व नशिल्या इंजेक्शनची विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईचे निर्देश दिले.

 पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाकडून तपास सुरू असताना, पथकातील पोलीस अंमलदार सागर चौगले व प्रदीप पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इचलकरंजी शहरातील उत्तम प्रकाश टॉकीज परिसरातील गोविंद अपार्टमेंट ते आवाडे नगर रोडवर एक इसम नशिल्या इंजेक्शनची विक्री करण्यासाठी येणार आहे.

या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी तातडीने छापा कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सापळा रचून साहिल किरण पाटील वय १९, राहणार बेघर वसाहत, पाण्याच्या टाकीजवळ, यड्राव, ता. हातकणंगले, यास ताब्यात घेण्यात आले.

तपासणीदरम्यान आरोपीच्या टीव्हीएस ज्युपीटर मोपेडच्या डिक्कीतून

MEPHENTERMINE SULPHATE कंपनीच्या ६७ नशिल्या इंजेक्शनच्या बाटल्या, गुन्ह्यासाठी वापरलेली मोपेड व मोबाईल असा १,१२,३९१/- किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. हा सर्व मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेनुसार जप्त करण्यात आला आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांची चिठ्ठी व अधिकृत परवाना नसताना नशिल्या इंजेक्शनची विक्री केल्याप्रकरणी आरोपीविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही यशस्वी कारवाई वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, तसेच पोलीस अंमलदार सागर चौगले, प्रदीप पाटील, महेश पाटील, वैभव पाटील, महेंद्र कोरवी व विशाल चौगुले यांनी अत्यंत दक्षता, नियोजनबद्ध पद्धत व तत्परतेने काम करत ही कारवाई यशस्वी केली.

अवैध नशिल्या पदार्थांविरोधातील ही कारवाई पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे व समाजहितासाठीच्या बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरत आहे.

No comments:

Powered by Blogger.