Header Ads

अबब! महाराष्ट्रात हजारो जेष्ठ नागरिक जन्मनोंदणीशिवाय; सरकारी यंत्रणेचे मोठे दुर्लक्ष उघड.

 अबब! महाराष्ट्रात हजारो जेष्ठ नागरिक जन्मनोंदणीशिवाय; सरकारी यंत्रणेचे मोठे दुर्लक्ष उघड.

------------------------------------

सातारा जिल्हा प्रतिनिधी 

अमर इंदलकर

------------------------------------

महाराष्ट्र राज्यात धक्कादायक वास्तव समोर आले असून राज्यातील अनेक वयोवृद्ध नागरिकांची साधी जन्मनोंदही झालेली नाही, अशी गंभीर बाब उघडकीस आली आहे. विशेषतः 1955 ते 1978 या कालावधीत जन्मलेल्या तसेच त्याहीपूर्वीच्या काळातील नागरिकांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येत आहे.

त्या काळात बहुतांश प्रसूती घरगुती पद्धतीने होत असल्याने अनेक मुलांची जन्मनोंद ग्रामपंचायत किंवा संबंधित कार्यालयात करण्यात आलेली नाही. परिणामी आज हेच नागरिक शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहण्याच्या भीतीत जीवन जगत आहेत.

आश्चर्याची बाब म्हणजे या व्यक्तींपैकी अनेकांकडे मतदान ओळखपत्र, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड यापैकी कोणतेही अधिकृत ओळखपत्र उपलब्ध नाही. काहींकडे शाळेचा दाखला आहे; मात्र अधिकृत जन्मदाखला नसल्याने विविध शासकीय कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत.

यापैकी अनेकांनी “वकिलांना पैसे द्यावे लागतील”, “तहसील कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागतील” या भीतीने जन्मनोंदणीचा विषयच टाळल्याचे सांगितले. काही ठिकाणी कागदपत्रांच्या अभावामुळे वृद्धापकाळ निवृत्तीवेतन, आरोग्य सुविधा, जमीन हक्क यांसारख्या बाबींमध्येही अडचणी येत असल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्रातच जन्म घेऊनही जन्माची नोंद नसणे ही अत्यंत गंभीर आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाची बाब मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने विशेष मोहिम राबवून अशा नागरिकांची तत्काळ जन्मनोंदणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

ही बाब उघडकीस आल्याने राज्यभरात खळबळ उडाली असून प्रशासन याकडे किती गांभीर्याने लक्ष देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Powered by Blogger.