Header Ads

भुयेवाडीत बिबट्याचा हल्ला; मेंढपाळाची शेळी ठार, एक जखमी पहाटेच्या सुमारास कळपावर हल्ला; अंदाजे ४० हजारांचे नुकसान, वनविभागाकडून तातडीच्या कारवाईची मागणी.

 भुयेवाडीत बिबट्याचा हल्ला; मेंढपाळाची शेळी ठार, एक जखमी

पहाटेच्या सुमारास कळपावर हल्ला; अंदाजे ४० हजारांचे नुकसान, वनविभागाकडून तातडीच्या कारवाईची मागणी.

-------------------

शशिकांत कुंभार .

---------------------


भुयेवाडी (ता. करवीर) :

भुयेवाडी येथे बिबट्या सदृश्य वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मेंढपाळाची एक शेळी ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि. ११ एप्रिल २०२६) पहाटे घडली. या घटनेमुळे मेंढपाळ रघुनाथ पांडुरंग हजारे यांना सुमारे ४० हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुयेवाडी येथील रघुनाथ हजारे, भारत हराळे, आप्पाजी हराळे, जयवंत अष्टेकर आदी मेंढपाळांचा सुमारे ३०० शेळ्या-मेंढरांचा कळप हा यशवंत मारुती पाटील यांच्या शेतात खतासाठी ठेवण्यात आला होता. शनिवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या सदृश्य वन्यप्राण्याने अचानक कळपावर हल्ला चढवला.

कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकून मेंढपाळ जागे झाले. त्यांनी आरडाओरडा करत वन्यप्राण्याला पिटाळून लावले. मात्र, तोपर्यंत दोन शेळ्यांवर हल्ला झाला होता. जखमी शेळ्यांवर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वुणवणे यांनी उपचार सुरू केले; परंतु उपचारादरम्यान एका शेळीचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी तात्काळ वनपाल विकास घोलप व पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधून पंचनामा करण्याची मागणी केली. तसेच त्यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.

दरम्यान, भुयेवाडी, कासारवाडी, शिये व आंबप परिसरात बिबट्या, तरस व गव्यांची दहशत वाढत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. यापूर्वीही गव्याच्या हल्ल्यात एका तरुणाचा बळी गेला आहे. त्यामुळे वनविभागाने तत्काळ कारवाई करून वन्यप्राणी पकडून सुरक्षित ठिकाणी सोडावेत, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी संजय वाघमोडे यांनी केली.

घटनास्थळी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ पाटील, मच्छिंद्र बिडगर, वाल्मीक बिडगर, भाऊसाहेब हलवर, सरपंच सचिन देवकुळे, संभाजी खोत यांच्यासह परिसरातील शेतकरी व मेंढपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.