नवनवीन शेती प्रयोगातून अर्थकारण मजबूत; करनूरच्या अमोल चौगुले यांची यशोगाथा.
नवनवीन शेती प्रयोगातून अर्थकारण मजबूत; करनूरच्या अमोल चौगुले यांची यशोगाथा.
-------------
शशिकांत कुंभार.
--------------
करनूर (ता. कागल) येथील तरुण शेतकरी अमोल दादासो चौगुले यांनी शेतीतील नवनवीन प्रयोगांच्या जोरावर आर्थिक घडी बसवण्याचा आदर्श निर्माण केला आहे. अवघ्या २० गुंठे क्षेत्रात उडीद पिकातून तब्बल ५ क्विंटल उत्पादन घेऊन त्यांनी इतर शेतकऱ्यांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.
आज खत, मजुरी व मशागत खर्च वाढल्यामुळे पारंपरिक शेती परवडेनाशी झाल्याची तक्रार अनेक शेतकरी करत असताना, कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांची निवड करून उत्पादन कसे वाढवता येते, हे अमोल चौगुले यांनी दाखवून दिले आहे. उडीद हे पीक साधारण ६० ते ८० दिवसांत येते व कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारे कडधान्य असल्याने त्यांनी याची निवड केली.
अमोल चौगुले यांनी ऊस पिकानंतर अर्ध्या एकरात ट्रॅक्टरने मशागत करून सरी सोडल्या. सरीत 20:20:00:13 खताचा वापर करून अर्धा फूट अंतरावर विश्वास जातीचे बियाणे पेरले. योग्य वेळी पाणी दिल्यानंतर आठ दिवसांत उगवण झाली. पुढे २०, ३५, ५० व ६५ दिवसांनी वेळोवेळी बुरशीनाशक, कीटकनाशक व सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करण्यात आली. परिणामी पिकाला भरघोस फुलोरा येऊन शेंगा चांगल्या भरल्या.
सध्या उडीद पिकाची वाढ समाधानकारक असून ५ ते ६ क्विंटल उत्पादनाची अपेक्षा अमोल चौगुले यांनी व्यक्त केली आहे. वाढत्या फास्ट फूडच्या युगात आरोग्यदायी कडधान्यांचे महत्त्व लक्षात घेऊन उडीद पिकाची मागणीही वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
या यशामध्ये त्यांचे वडील दादासो चौगुले, आई पुष्पांजली चौगुले, पत्नी ऐश्वर्या चौगुले, शेती मार्गदर्शक संजय तिवारी तसेच मदतनीस नारायण गुरव यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले.
शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत अर्थकारण सुधारण्यासाठी झटणाऱ्या अमोल चौगुले या तरुण शेतकऱ्याने उडीद पिकातून इतरांसाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
फोटो : उडीद पीक घेतलेले अमोल चौगुले (लाल टी-शर्ट) सोबत आई-वडील व मार्गदर्शक

No comments: