नियतीचा खेळ क्रूर! तीनदा मृत्यूला हरवलेल्या तरुणाचा चौथ्यांदा अपघातात दुर्दैवी अंत
नियतीचा खेळ क्रूर! तीनदा मृत्यूला हरवलेल्या तरुणाचा चौथ्यांदा अपघातात दुर्दैवी अंत.
______________________कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथे घडलेली एक हृदयद्रावक घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. २५ वर्षीय आकाश रमेश गोसावी याचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून, नियतीच्या या क्रूर खेळाने संपूर्ण परिसर हळहळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुरुंदवाडहून तेरवाडकडे जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराने भरधाव वेगात धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघातात आकाशचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा युवक गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, आकाश गेल्या अवघ्या आठ दिवसांत तीन वेळा वेगवेगळ्या अपघातांतून सुखरूप बचावला होता. रत्नागिरी मार्गावर, तेरवाड परिसरात आणि कुरुंदवाड येथे झालेल्या अपघातांतून तो सुदैवाने वाचला होता. मात्र, चौथ्यांदा नियतीने त्याला संधी दिली नाही.
अपघातानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला व नंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आकाशच्या पश्चात आई-वडील आणि बहीण असा परिवार असून, या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
कधी कधी आयुष्य अनेक संधी देतं… पण शेवटी नियतीसमोर सर्व काही हतबल ठरतं. मागे राहतात त्या फक्त आठवणी… आणि अश्रू…

No comments: