Header Ads

विट्यात कौटुंबिक वादातून तरुणीची हत्या; पती फरार प्रेमविवाहानंतर वाढले तणाव; चिमुकल्याला मित्राकडे ठेवून आरोपीचा पलायन.

 विट्यात कौटुंबिक वादातून तरुणीची हत्या; पती फरार

प्रेमविवाहानंतर वाढले तणाव; चिमुकल्याला मित्राकडे ठेवून आरोपीचा पलायन.

--------------------------

सांगली मिरज प्रतिनिधी.

राजु कदम .

--------------------------

विटा शहरात कौटुंबिक वादातून एका तरुण विवाहित महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. पतीनेच डोक्यात जड वस्तूने प्रहार करून पत्नीचा खून केल्याचा संशय असून, आरोपी घटनेनंतर फरार झाला आहे.

मृत महिलेचे नाव काजल उर्फ श्रद्धा अविनाश लोटे (वय २३) असे आहे. तर संशयित पती अविनाश तुकाराम लोटे याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या प्रकरणी मयत महिलेच्या नातेवाईकांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काजल आणि अविनाश यांचा काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. विवाहानंतर काही काळ सर्व काही सुरळीत होते; मात्र अलीकडे पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याचे समोर आले आहे. या दाम्पत्याला तीन वर्षांचा मुलगा आहे.

घटनेच्या आदल्या दिवशी आरोपीने आपल्या मुलाला मित्राकडे ठेवले होते. त्यानंतर रात्री उशिरा घरी परतल्यावर पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद टोकाला गेल्याने पहाटेच्या सुमारास आरोपीने पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळी बराच वेळ घराचे दार न उघडल्याने शेजाऱ्यांना संशय आला. घरात पाहणी केली असता काजल रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

दरम्यान, आरोपी पती फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या घटनेमुळे विटा शहरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुढील तपास विटा पोलीस निरीक्षक करत आहेत.

No comments:

Powered by Blogger.