येणारा काळ ‘अविवाहितपणाचे युग’ ठरणार का? समाजापुढे गंभीर प्रश्न*
*येणारा काळ ‘अविवाहितपणाचे युग’ ठरणार का? समाजापुढे गंभीर प्रश्न*
------------------------सौ माधुरी मस्कर -पन्हाळा*
9623995566
------------------------
अलीकडील एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणाने समाजाच्या पारंपरिक रचनेपुढे गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. मॉर्गन स्टॅन्ली संस्थेच्या सविस्तर अभ्यासावर आधारित आणि १ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, पुढील सहा वर्षांत जगातील सुमारे ४५ टक्के मुली अविवाहित राहू शकतात.
या बदलामागे आजच्या मुलींचे उच्च शिक्षण आणि करिअरला दिलेले प्राधान्य हे प्रमुख कारण आहे. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालेल्या मुली आता कोणावर अवलंबून राहू इच्छित नाहीत. त्यांना स्वातंत्र्य प्रिय असून स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याकडे त्यांचा कल वाढला आहे. विवाह, मातृत्व आणि कौटुंबिक बंधने ही आपल्या प्रगतीतील अडथळा ठरतात, अशी भावना अनेक तरुणींमध्ये निर्माण होत आहे.
ही प्रवृत्ती कायम राहिली तर पारंपरिक कुटुंब व्यवस्था आणि सामाजिक रचना ढासळू शकते, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. लोकसंख्या घट, अविवाहित मुलांची संख्या वाढणे आणि वृद्धावस्थेत एकटेपणाच्या समस्या निर्माण होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. प्रगती, पद आणि पैसा याचा उपयोग काय, जर आयुष्याच्या शेवटी साथ देणारा कोणीच नसेल, हा प्रश्न अनुत्तरित राहतो.
सध्या अनेक पालक मुलींसाठी स्थळे शोधत आहेत, पण मुलींनाच विवाहात रस नसल्यामुळे प्रत्येक प्रस्ताव नाकारला जात आहे. समाजातील मोठ्या घटकाला या बदलाची गंभीरता अजून समजलेली नाही, म्हणून वेळेवर जागे होणे आवश्यक आहे. मुलींच्या विवाहासाठी योग्य वय २३ ते २६ वर्षे मानले जाते आणि शक्य असल्यास त्याहीपेक्षा लवकर विवाह व्हावा, यासाठी सामूहिक पातळीवर जागरूकता आणि प्रयत्न गरजेचे आहेत.
ग्रामीण भागात तर ही समस्या अधिकच बिकट झाली आहे. शेती हाच एकमेव व्यवसाय असल्यामुळे शेतकरी मुलांना मुली लग्नासाठी मिळत नाहीत. मुली आणि त्यांच्या कुटुंबीयांचा कल नोकरी करणाऱ्या, शहरात स्थायिक झालेल्या मुलांकडेच अधिक आहे. शेतीला प्रतिष्ठा नसल्यासारखे वातावरण तयार झाले असून, कष्टाचे काम, अनिश्चित उत्पन्न आणि पावसावर अवलंबून असणारी शेती या कारणांमुळे मुली शेतकरी मुलाशी लग्न करण्यास नकार देतात. त्यामुळे हजारो शेतकरी युवक ३५ ते ४० वर्षांनंतरही अविवाहित आहेत.
याशिवाय सुशिक्षित असो वा कमी शिकलेली, मुलीच्या आईचा मुलीच्या जीवनातील अनियंत्रित हस्तक्षेप हा देखील विवाह न जुळण्यामागचे मोठे कारण ठरत आहे. मुलीपेक्षा मुलीच्या आईच्या वाढलेल्या मागण्या आणि लग्नाच्या वयातच मुलाकडे ठेवलेल्या अवास्तव अपेक्षा यामुळे अनेक चांगली स्थळे मोडतात. स्वतःचे घर, चारचाकी गाडी, लाखोंचा पगार, शहरात फ्लॅट अशा अपेक्षा मुलाकडून केल्या जातात. ज्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी मुलीच्या वडिलांना संपूर्ण आयुष्य व्यतीत करावे लागले, त्या सर्वच गोष्टी मुलीचे लग्न ठरवत असताना मुलाने २५ ते ३० वर्षे या वयातच पूर्ण कराव्यात, ही अपेक्षा कशी शक्य आहे, असा सवाल तरुण वर्गातून उपस्थित होत आहे. या अवास्तव अपेक्षांमुळे योग्य वयात लग्न जुळत नाहीत आणि नंतर वय वाढल्यावर पश्चाताप करण्याची वेळ येते.
भविष्यातील आकडेवारी अधिक विचार करायला लावणारी आहे. जेव्हा मुलांचे लग्न २० व्या वर्षी होत होते तेव्हा एका शतकात ५ पिढ्या होत. लग्न २५ व्या वर्षी होऊ लागल्यावर ४ पिढ्या झाल्या. आता ३० व्या वर्षी लग्न होत असल्याने एका शतकात फक्त ३ पिढ्याच उरतात. आज गल्ली-मोहल्ले ओस पडले आहेत आणि आजूबाजूची घरे रिकामी होत आहेत. घरांत मुलांच्या आवाजापेक्षा पती-पत्नीचे आवाज जास्त ऐकू येतात. मुली ३० ते ३५ वर्षांपर्यंत तर मुलगे ३५ वर्षांनंतरही अविवाहित आहेत. उशिरा लग्न आणि त्यानंतर घटस्फोटाचे प्रमाण वाढल्याने कुटुंबे तुटत आहेत, पालक दुःखी आहेत आणि संपूर्ण पिढी रिकामेपण अनुभवते आहे.
जर ५० जोडप्यांमध्ये फक्त एकच मूल असेल तर पुढील पिढीत मुले खूपच कमी राहतील. असेच चालू राहिले तर तिसरी पिढी जवळजवळ नाहीशी होईल. गावे हळूहळू संपत आहेत. शहरांमध्ये उंच इमारती आहेत, पण संयुक्त कुटुंब व्यवस्था संपत चालली आहे. नव्या सुना ‘फक्त एकच मूल’ हवे असे म्हणतात. सत्य हे आहे की आता मुले प्रेमाचे प्रतीक राहिली नाहीत, मुलांना जन्म देणे ही एक जबाबदारी किंवा मजबुरी झाली आहे.
विवाह हा फक्त बंधन नाही तर तो कुटुंब आणि समाजाचा पाया आहे. संस्कृती, परंपरा आणि पिढ्या पुढे नेण्याचा मार्ग विवाहातूनच जातो. मुलांना अति स्वातंत्र्य देऊन आपण त्यांची समज कमी केली आहे. लग्न पुढे ढकलले गेले आणि जेव्हा झाले तेव्हा उशीर झाला होता, आणि मग पुन्हा तेच एकटेपण आले.
हा विषय कोणाच्या विरोधात नसून भविष्यातील स्थैर्य आणि संतुलनाच्या चिंतेतून मांडला आहे. समाज, कुटुंब आणि वैयक्तिक जीवन यांचा समतोल राखणे हीच खरी प्रगती आहे. कुटुंब नसेल तर समाज टिकणार नाही, यावर सर्वांनी गांभीर्याने विचार करून वेळेवर योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.

No comments: