Header Ads

फार्मा आयटीत करिअरच्या सुवर्णसंधी; सरोजिनी कॉलेजमध्ये राष्ट्रीय स्तरावरील भव्य उपक्रम.

 फार्मा आयटीत करिअरच्या सुवर्णसंधी; सरोजिनी कॉलेजमध्ये राष्ट्रीय स्तरावरील भव्य उपक्रम.

--------------------------------

रोहित पास्ते प्रतिनिधी :

-------------------------------

सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी “नॅशनल लेव्हल फार्मा आयटी कनेक्ट अँड पूल कॅम्पस ड्राईव्ह – २०२६” हा भव्य उपक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात रिझ्युमे स्पर्धा, तज्ज्ञ मार्गदर्शन सत्र तसेच पूल कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमासाठी पुणे येथील KITE-Ai Technologies Pvt. Ltd. तसेच कोल्हापूरमधील Bharari Digital Solutions (BDS) यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात फार्मा आयटी क्षेत्रातील विविध करिअर संधींबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमात पुणे, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा व कोल्हापूर या भागांतील १५ महाविद्यालयांमधील १३५ हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमात क्लिनिकल संशोधन क्षेत्रातील करिअरविषयी मार्गदर्शन करताना कु. गायत्री शार्दूल यांनी क्लिनिकल डेटा मॅनेजमेंटमधील संधी, आवश्यक कौशल्ये व रोजगाराच्या शक्यता याबाबत माहिती दिली. बी. फार्मसी विद्यार्थ्यांसाठी ₹३.६ ते ₹९ लाख वार्षिक वेतनाच्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एसएएस किंवा तत्सम प्रमाणपत्रास प्राधान्य दिले जात असल्याचे नमूद केले.

तसेच श्री. बृजेश ए. तलावडेकर यांनी वैद्यकीय कोडिंग व मेडिको समरीकरण क्षेत्रातील करिअर संधींबाबत माहिती देताना बी. फार्मसी विद्यार्थ्यांसाठी ₹१.४४ ते ₹४.२० लाख वार्षिक वेतनाच्या नोकरी संधी उपलब्ध असल्याचे सांगितले.

कार्यक्रमासाठी माननीय अध्यक्षा श्रीमती शोभा के. तावडे तसेच माननीय सचिव श्री. सुजय के. तावडे यांनी शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनी प्रगत ज्ञान आत्मसात करून बदलत्या उद्योग क्षेत्राशी सुसंगत राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. संचालक डॉ. ए. आर. कुलकर्णी यांनी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून स्वतःला अद्ययावत ठेवण्याचे आवाहन केले, तर प्राचार्य व संयोजक डॉ. ए. यू. अरविंदेकर यांनी उद्योग-शैक्षणिक दरी कमी करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी श्री. बी. एस. वर्णे यांचा मोलाचा सहभाग होता. त्यांच्या उत्कृष्ट समन्वय व व्यवस्थापनामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी आणि उल्लेखनीय ठरला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष माहिती मिळून त्यांच्या करिअरला नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थित विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

No comments:

Powered by Blogger.