Header Ads

सह्याद्री स्टार्च कंपनीच्या दूषित पाण्याचा कहर? १५ जनावरे दगावली; मेंढपाळांचे लाखोंचे नुकसान कुपवाड परिसरात खळबळ • प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नमुने तपासणीसाठी पाठवले • अहवालानंतरच सत्य स्पष्ट

 सह्याद्री स्टार्च कंपनीच्या दूषित पाण्याचा कहर? १५ जनावरे दगावली; मेंढपाळांचे लाखोंचे नुकसान

कुपवाड परिसरात खळबळ • प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नमुने तपासणीसाठी पाठवले • अहवालानंतरच सत्य स्पष्ट.

------------------------------------

मिरज तालुका : प्रतिनिधी राजू कदम.

------------------------------------

कुपवाड परिसरात औद्योगिक दूषित पाण्यामुळे जनावरांच्या मृत्यूची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, गेल्या काही दिवसांत तब्बल १५ हून अधिक मूक जनावरे दगावल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मेंढपाळांचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुरुवारी (दि. ३० एप्रिल) सकाळी जुन्या मिरज रस्त्यालगत असलेल्या एका नामांकित कंपनीच्या शेतात चरण्यासाठी गेलेल्या मेंढ्यांनी तेथील साचलेले पाणी पिल्यानंतर सहा मेंढ्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. पाणी पिल्यानंतर काही वेळातच मेंढ्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला आणि त्या जागीच कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

या घटनेत सोमराया तुकाराम पुजारी (रा. अकोळ, ता. चिकोडी) आणि राजाराम रामा हजारे (रा. शेंदूर, ता. कागल) या मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले आहे. एका मेंढीची किंमत सुमारे ३० हजार रुपये धरल्यास, सहा मेंढ्यांमुळे सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर गेल्या काही दिवसांत १५ जनावरे दगावल्याने एकूण नुकसान लाखोंमध्ये गेले आहे.

घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने उपचार करून एका मेंढीचा जीव वाचवला. तसेच कुपवाड एमआयडीसी पोलीस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली असून, पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. मृत मेंढ्यांचा पंचनामा करून शवविच्छेदनही करण्यात आले आहे.

दरम्यान, “पशुवैद्यकीय अहवाल आणि प्रदूषण मंडळाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. तोपर्यंत तपास सुरू आहे,” अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

“आम्ही दाद कोणाकडे मागायची?” – मेंढपाळांचा आक्रोश

हातावर पोट असलेल्या मेंढपाळांवर या घटनेमुळे उपासमारीचे संकट ओढवले असून, तातडीने आर्थिक मदत व जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनीही केली आहे.

No comments:

Powered by Blogger.