हुडा (ता. राधानगरी) येथे भीषण आग; १५ एकरांची काजू-आंब्याची बाग खाक
हुडा (ता. राधानगरी) येथे भीषण आग; १५ एकरांची काजू-आंब्याची बाग खाक
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट; २२ ते २५ लाखांचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
------------------------राधानगरी प्रतिनिधी :
-----------------------
राधानगरी तालुक्यातील हुडा गावात भीषण आग लागून शेतकरी मारुती सातपुते यांची १५ एकरांवरील काजू-आंब्याची बाग पूर्णपणे जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या आगीत बागेतील विविध फळझाडे व लागवडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये ३ वर्षांची १५० नारळ झाडे, १२ वर्षांची ७० काजू झाडे, ३ वर्षांची ७० पेरू झाडे, सुमारे १५०० चिवा-बांबू, ५० रातांब्ब, ८० जांभळ, ११० आवळा झाडे तसेच ४०० मसाले व औषधी वनस्पतींचा समावेश आहे. याशिवाय सुमारे ३००० जंगली झाडेही आगीत जळून खाक झाली.
आगीमुळे ११ एकर क्षेत्रावरील ड्रिप सिंचनाची सबमेन लाईन तसेच सोलर पॅनेलचेही मोठे नुकसान झाले आहे. या संपूर्ण घटनेत अंदाजे २२ ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. आगीमागील नेमके कारण काय, याबाबत अद्याप स्पष्टता नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.
दरम्यान, अचानक आलेल्या या आपत्तीमुळे शेतकरी मारुती सातपुते यांच्यावर आर्थिक संकट कोसळले असून शासनाने तातडीने पंचनामा करून मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.

No comments: