काळोखी डोहात दुर्दैवी घटना! १६ वर्षीय पर्यटकाचा बुडून मृत्यू; पर्यटकांना प्रवेशबंदी
काळोखी डोहात दुर्दैवी घटना! १६ वर्षीय पर्यटकाचा बुडून मृत्यू; पर्यटकांना प्रवेशबंदी.
----------------------------------+राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे.
--------------------------------------
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील काळमवाडी परिसरातील काळोखी डोहात एक हृदयद्रावक घटना घडली असून १६ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पर्यटकांसाठी कडक निर्णय घेत प्रवेशबंदी जाहीर केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वराज संदीप शिंदे (वय १६, रा. ओवळी ता. चिपळूण जि. रत्नागिरी, सध्या पुणे) हा दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४:३० वाजता काळमवाडी परिसरात पर्यटनासाठी आला होता. यावेळी काळोखी डोहातील पाण्याचा अचूक अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तत्काळ शोधमोहीम सुरू केली. अखेर आज दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजता आपत्ती व्यवस्थापन पथकाने युवकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात दिला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
या शोधमोहीमेत कृष्णात सोरटे, शुभम काटकर, प्रीतम केसरकर, आदिनाथ कांबळे, अविनाश चरापले, शुभम म्हडगूत, सुदेश चव्हाण, शैलेश हांडे, रोहन चौगुले, रोहित जाधव तसेच राधानगरी पोलीस यांनी मोलाचे सहकार्य केले.
दरम्यान, वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी काळोखी डोह परिसरात पर्यटकांना प्रवेशासाठी परवानगी नाकारली असून, या ठिकाणी कायमस्वरूपी बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी व पर्यटकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments: