विनयभंग प्रकरणात राघू देवणे निर्दोष; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल”
“विनयभंग प्रकरणात राघू देवणे निर्दोष; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल”
-----------------------------------------गगनबावडा प्रतिनिधी : सुनिल मोळे.
-----------------------------------------
पन्हाळा तालुक्यातील वेतवडे पैकी भेंडाई धनगरवाडा येथील रहिवासी राघू देवणे यांची विनयभंग व जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणातून कळे-खेरीवडे येथील प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
सदर प्रकरण १४ ऑगस्ट २०२० रोजी घडल्याचे सांगण्यात आले होते. फिर्यादी भागुबाई विठ्ठल देवणे यांनी कळे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, जखनी नावाच्या शेतात आरोपी राघू देवणे यांनी त्यांचा हात धरून विनयभंग केला तसेच केस धरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. या तक्रारीनंतर कळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती.
तपास पूर्ण झाल्यानंतर प्रकरण न्यायालयात दाखल झाले. सरकारी पक्षाकडून साक्षीदार तपासण्यात आले. मात्र आरोपीतर्फे काम पाहणारे ॲड. व्ही. एस. पाटील यांनी साक्षीदारांची प्रभावी उलटतपासणी करत तपासातील त्रुटी न्यायालयासमोर मांडल्या. आरोपी व फिर्यादी यांच्यात पूर्वीपासून वाद असल्याचेही बचाव पक्षाने पुराव्यांसह स्पष्ट केले.
सर्व पुरावे, साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायमूर्ती श्रीमती व्ही. ए. लावंड-कोकाटे यांनी दिनांक ५ मे २०२६ रोजी राघू देवणे यांची निर्दोष मुक्तता केली.
या निकालाची परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून न्यायालयीन प्रक्रियेत पुराव्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

No comments: