Header Ads

गांधीनगर भूमापन कार्यालयावर ‘कुलूप’ टाकण्याचा इशारा; नागरिकांच्या संतापाला उधाण.

 गांधीनगर भूमापन कार्यालयावर ‘कुलूप’ टाकण्याचा इशारा; नागरिकांच्या संतापाला उधाण.

-------------------------------

संस्कार कुंभार.

---------------------------

कोल्हापूर,  – गांधीनगर येथील नगर भूमापन कार्यालयातील ढिसाळ कारभार, अधिकाऱ्यांची सतत अनुपस्थिती आणि प्रलंबित कामांच्या ढिगाऱ्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांचा आवाज आता रस्त्यावर येण्याच्या तयारीत आहे. करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने थेट ‘कुलूप आंदोलन’ करण्याचा इशारा देत प्रशासनाला धारेवर धरले आहे.

गांधीनगर सज्जामध्ये वाढलेल्या गावांच्या समावेशामुळे कामाचा प्रचंड ताण असतानाही कार्यालय आठवड्यातून फक्त दोन दिवस सुरू राहते. त्यातही अनेकदा “मोजणीसाठी बाहेर गेलो” असा फलक लावून अधिकारी गायब असल्याने दूरवरून आलेल्या नागरिकांना अक्षरशः निराश होऊन परतावे लागत आहे. कडक उन्हात वयोवृद्ध आणि महिलांची होणारी गैरसोय संतापजनक ठरत आहे.

अर्जांची वाढती संख्या, तक्रारींचा ढिगारा आणि कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा यामुळे नागरिकांची अत्यावश्यक कामे महिनोन्‌महिने रखडली आहेत. “कार्यालय आहे की केवळ नावापुरते?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेने प्रशासनाला जोरदार धक्का देत तात्काळ चौकशी, संबंधित कर्मचाऱ्यांची जबाबदारीत बदल आणि अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी केली आहे. “नागरिकांना वेळेत सेवा न मिळाल्यास गांधीनगर कार्यालयाला कायमस्वरूपी कुलूप ठोकले जाईल,” असा थेट इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, उपअधीक्षक किरण माने यांनी मंगळवार व शुक्रवार या दिवशी अधिकारी उपस्थित राहतील व प्रलंबित कामे कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले असले तरी नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र नाराजी कायम आहे.

या निवेदनावेळी तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, राजू सांगावकर, योगेश लोहार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आता प्रशासन जागे होणार की कुलूप आंदोलन अटळ? असा सवाल परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.

No comments:

Powered by Blogger.