Header Ads

“शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचार समाजात रुजविणारे कार्य गौरवास्पद”! —आनंदराज आंबेडकर...

 “शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचार समाजात रुजविणारे कार्य गौरवास्पद”! —आनंदराज आंबेडकर...

-----------------------------
 पुसद तालुका प्रतिनिधी.
----------------------------

[ज्ञानदीप सामाजिक विकास संस्थेच्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार’ सोहळ्यातआनंदराज आंबेडकर यांचे प्रतिपादन]

 “समाजामध्ये परिवर्तन घडवायचे असेल तर महापुरुषांची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालत समाजप्रबोधन आणि समाजहिताचे कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींचा सन्मान होणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे,” असे प्रतिपादन इंदू मिल स्मारकाचे प्रणेते तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी केले. ज्ञानदीप सामाजिक विकास संस्था, नाशिक महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार” वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

ज्ञानदीप सामाजिक विकास संस्था, नाशिक महाराष्ट्र यांच्या वतीने दिला जाणारा “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार” वितरण सोहळा कामटवाडे येथील समुद्र लॉन्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमात समाजाभिमुख कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना एकूण ७० राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कारार्थींना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, फ्रेम व गोल्ड मेडल देऊन गौरविण्यात आले.

समाजातील गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि आर्थिक अडचणीमुळे त्यांचे शिक्षण थांबू नये या उद्देशाने ज्ञानदीप सामाजिक विकास संस्थेच्या वतीने शालेय साहित्य व शैक्षणिक खर्चासाठी ११ हजार रुपयांचा धनादेश सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ डॉ. रावसाहेब घोडेराव यांना सुपूर्त करण्यात आला. संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.

कार्यक्रमास रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशील सूर्यवंशी, नाशिक महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त नानासाहेब साळवे, राज्य प्रवक्ते डॉ. अविनाश शिंदे, नाशिक जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड, माजी स्थायी समिती सभापती संजय साबळे, दैनिक महासागरचे वृत्त संपादक सुधीर उमराळकर, पत्रकार संजय दोंदे, रील स्टार आसावरी बर्वे तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल आठवले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिल आठवले यांनी केले. सूत्रसंचालन अश्विनी पुरी यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव मिलिंद कळवणकर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन समितीचे प्रमुख रविंद्रकुमार गायकवाड, उपाध्यक्ष एम.डी. प्रताप, अनिल कळंके, पंकज पवार, रवी खैरे, सुशील गांगुर्डे, आनंद दाभाडे, विवेक बनकर, मनोज मुंडे, दिनेश निकाळजे, गोपाळ कदम, उत्तम द्विवेदी, सुभाष चिरमाडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Powered by Blogger.