आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवशीच काळाचा घाला! बीसीएत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेला तरुण भोगावती नदीत बुडाला; आवळी बुद्रुक गाव शोकमग्न.
आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवशीच काळाचा घाला!
बीसीएत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेला तरुण भोगावती नदीत बुडाला; आवळी बुद्रुक गाव शोकमग्न.
-------------------------------------राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे.
------------------------------------
राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक येथे बुधवारी दुपारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. बी.सी.ए. पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या तरुणाचा भोगावती नदीपात्रात पोहण्यासाठी गेले असता खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. प्रेम सतीश बागडी (वय २३) असे या युवकाचे नाव असून सायंकाळपर्यंत त्याचा मृतदेह हाती लागला नव्हता. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम हा आज दुपारी तीनच्या सुमारास गावाजवळील नवीन पुलाशेजारी भोगावती नदीपात्रात आंघोळीसाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो अचानक खोल पाण्यात गेला आणि वाहत्या प्रवाहात बुडू लागला. त्याच्यासोबत असलेल्या दहा वर्षांच्या चुलत भावाने आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी धावले. मात्र तोपर्यंत प्रेम पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता झाला होता.
घटनेची माहिती मिळताच नदी परिसरात ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली. राधानगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. स्थानिक तरुणांनी सायंकाळपर्यंत शोधमोहीम राबवली, मात्र पाण्याचा वेगवान प्रवाह आणि अंधारामुळे मृतदेह सापडू शकला नाही. गुरुवारी सकाळी पुन्हा रेस्क्यू टीमच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, प्रेमचा कालच बी.सी.ए. पदवीचा निकाल लागला होता आणि तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला होता. सोशल मीडियावर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू असतानाच आज ही दुर्दैवी घटना घडली. त्यातच आज त्याच्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने आनंदाच्या घरात क्षणात दु:खाचे सावट पसरले. वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंब एकत्र आले असताना नियतीने बागडी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
प्रेमचे वडील सतीश बागडी हे नोकरीनिमित्त अनेक वर्षांपासून कुरुंदवाड येथे वास्तव्यास आहेत. कौटुंबिक कारणामुळे ते गावी आले असताना ही घटना घडली. प्रेम हा घरातील एकुलता एक मुलगा असून अभ्यासात हुशार, शांत आणि मनमिळाऊ स्वभावामुळे गावात सर्वांचा लाडका होता. मुलाच्या घटनेची माहिती मिळताच आई-वडिलांनी केलेला आक्रोश उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आणणारा ठरला.

No comments: