Header Ads

कर्तव्यावर असलेल्या पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की; कोल्हापुरात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

 कर्तव्यावर असलेल्या पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की; कोल्हापुरात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल 





----------------------

कोल्हापूर प्रतिनिधी

 रहीम पिंजारी.
--------------------

कोल्हापूर:शहरातील रंकाळा तलाव परिसरात कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की करून, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चंद्रसेन सचिन चव्हाण (वय २१) आणि सचिन प्रल्हाद चव्हाण (वय ५६, दोन्ही रा. लाड चौक, शिवाजी पेठ) यांना ताब्यात घेतले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, १९ मे २०२६ रोजी रात्री उशिरा पोलीस निरीक्षक लोंढे आणि त्यांचे पथक रंकाळा चौपाटी परिसरात गस्त घालत होते. यावेळी 'चेंज-मी फिटनेस सेंटर' समोर काही तरुण मोठ्याने ओरडून गोंधळ घालत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलीस निरीक्षक लोंढे यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला असता, संशयित आरोपी चंद्रसेन चव्हाण याने पोलिसांशी हुज्जत घातली. त्याने "तुला माहिती नाही का मी कोण आहे?" असे म्हणत पोलीस निरीक्षकांच्या गणवेशाची कॉलर धरून त्यांना धक्काबुक्की केली आणि शिवीगाळ केली.

या घटनेनंतर चंद्रसेनने आपल्या वडिलांना फोन करून बोलावून घेतले. त्याचे वडील सचिन चव्हाण हे पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून (क्र. MH-09-GD-5656) त्या ठिकाणी आले. त्यांनी आपली गाडी थेट पोलीस गाडीसमोर आडवी लावली आणि पोलिसांना धमकावले. "तुम्ही माझ्या मुलाला कसे काय घेऊन जाता? उद्या त्याला सोडवून आणतो, तुम्हाला बघून घेतो," अशी धमकी देत त्यांनी शासकीय कामात अडथळा आणला.

याप्रकरणी पोलीस अंमलदार सचिन दादू कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३२, १२६, ३५२, ३५० आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार रेखा कांबळे आणि ए.पी.आय. चव्हाण करत आहेत.

No comments:

Powered by Blogger.