Header Ads

“बंदी आदेश फक्त कागदावरच?” काळोखी डोह परिसरात पुन्हा युवकाचा मृत्यू; प्रशासनाच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न.

 “बंदी आदेश फक्त कागदावरच?”

काळोखी डोह परिसरात पुन्हा युवकाचा मृत्यू; प्रशासनाच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न

--------------------

सौ रुपाली कुंभार.

--------------------

राधानगरी तालुक्यातील काळोखी डोह परिसर पुन्हा एकदा एका तरुणाच्या मृत्यूमुळे हादरला आहे. आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास काळोखी डोहापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या धोकादायक पाण्याच्या ठिकाणी कोल्हापूरातील एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित यंत्रणांच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

घटनेची माहिती मिळताच राधानगरी पोलीस यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू होते; मात्र अंधार पडल्यामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली असून उद्या सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

विशेष म्हणजे, या परिसरात यापूर्वीही अनेक युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे. वाढत्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर ‘फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीने सातत्याने बातम्या प्रसारित करून प्रशासनाला इशारा दिला होता. तसेच काळोखी डोह परिसर कायमस्वरूपी बंद करण्याची मागणीही करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी संबंधित परिसरात प्रवेशबंदी आदेश जारी केला होता.

मात्र बंदी आदेश अस्तित्वात असतानाही धोकादायक क्षेत्रात युवकांचा प्रवेश सुरूच कसा राहिला, हा आता चर्चेचा विषय ठरला आहे. परिसरात पुरेशी पोलीस गस्त, इशारा फलक, संरक्षक अडथळे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या होत्या का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, “वारंवार दुर्घटना होत असताना केवळ आदेश काढून चालणार नाही; प्रत्यक्षात कठोर अंमलबजावणी आणि कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था आवश्यक आहे.” अनेक दुर्घटना घडूनही संबंधित विभागांकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.

कायद्याच्या चौकटीत पाहता, धोकादायक क्षेत्र घोषित केल्यानंतर त्या ठिकाणी नागरिकांचा प्रवेश रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे, सूचना फलक उभारणे, सुरक्षाव्यवस्था मजबूत ठेवणे आणि जीवितहानी टाळण्यासाठी दक्षता घेणे ही संबंधित प्रशासनाची जबाबदारी मानली जाते. त्यामुळे या प्रकरणात पाटबंधारे विभाग, स्थानिक प्रशासन आणि राधानगरी पोलीस यांनी आवश्यक ती खबरदारी घेतली होती का, याबाबत चौकशीची मागणी आता जोर धरू लागली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर नागरिकांकडून काळोखी डोह परिसरात कायमस्वरूपी बंदी, कडक पोलीस बंदोबस्त, लोखंडी संरक्षक जाळी, देखरेख व्यवस्था आणि धोकादायक क्षेत्रात प्रवेश करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे.

“आणखी किती निष्पाप जीव गेल्यावर प्रशासन खडबडून जागे होणार?” असा संतप्त प्रश्न आता संपूर्ण राधानगरी तालुक्यातून विचारला जात आहे।

No comments:

Powered by Blogger.