Header Ads

जिल्ह्यात प्रथम येत राजवीर लाडची भरारी; चिरमुरे विक्रेत्याच्या मुलाने घडवला इतिहास!

जिल्ह्यात प्रथम येत राजवीर लाडची भरारी; चिरमुरे विक्रेत्याच्या मुलाने घडवला इतिहास!

-------------------------------------

राधानगरी प्रतिनिधी : विजय बकरे.

--------------------------------------

“परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते,” हे शिरसे (ता. राधानगरी) येथील राजवीर संजय लाड याने आपल्या दैदीप्यमान यशातून सिद्ध करून दाखवले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत राजवीरने दहावीच्या परीक्षेत तब्बल ९९.२० टक्के गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

राजवीरचे वडील गल्लीबोळात फिरून चिरमुरे विकतात, तर आई शेतात मोलमजुरी करून संसाराला हातभार लावते. अशा हलाखीच्या परिस्थितीतही राजवीरने अभ्यासात सातत्य ठेवत यशाचे शिखर गाठले. “आई-वडिलांचे कष्ट वाया जाऊ द्यायचे नाहीत,” हा निर्धार मनाशी बाळगून त्याने दिवस-रात्र मेहनत घेतली.

हासूर येथील हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असताना शिरसे येथील ‘शिवम अकॅडमी’चे त्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले. मार्गदर्शक सागर चौगुले व इतर शिक्षकांनी वेळोवेळी दिलेल्या प्रेरणेमुळेच हे यश मिळाल्याची भावना राजवीरने व्यक्त केली. भविष्यात कलेक्टर होऊन समाजासाठी काम करण्याचे त्याचे स्वप्न आहे.

दरम्यान, ‘शिवम अकॅडमी’च्या इतर विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश मिळवले. सई शिपूगडे (९३.६०%), साईप्रसाद हरणे (९२.२०%) आणि रुद्रतेज हंबीरराव पाटील (९०.२०%) यांनीही ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत यशाची परंपरा कायम राखली.

राजवीरचे हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, “शून्यातून विश्व निर्माण करता येते,” हेच त्याने आपल्या यशातून दाखवून दिले आहे. परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Powered by Blogger.