Header Ads

हरवलेली महिला तीन मुलांसह दोन दिवसांनी सुखरूप सापडली, ओतुर पोलिसांची यशस्वी कामगिरी..

 हरवलेली महिला तीन मुलांसह दोन दिवसांनी सुखरूप सापडली, ओतुर पोलिसांची यशस्वी कामगिरी.


आळेफाटा (प्रतिनिधी )आदिवासी समाजातील एक महिला तीन लहान मुलांसह हरवली असल्याची तक्रार दि. १२जून रोजी ओतुर पोलीस स्टेशनला  दाखल करण्यात आली होती. सदर महिला व मुले दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर सुखरूप सापडली असून त्यांना पती व नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांता राजकिरण केदार (वय ३३) ह्या माहेर, टोकाकडे, मुरबाड, कल्याण येथून सासरी बस्ती सावरगाव, ता. जुन्नर येथे जाण्यासाठी मुलगी अनन्या ९वर्ष,मुलगा रुद्र ३ वर्ष व ७ महिन्यांचा गणेश यांच्यासह बसमध्ये निघाल्या होत्या. त्या बनकर फाटा येथे उतरल्या. पती सायं. ६ वाजता घेण्यासाठी आले, मात्र महिलेकडे मोबाईल नसल्याने भेट होऊ शकली नाही. उशीर झाल्याने त्या परत कल्याण बसने टोकाकडे येथील मामाकडे गेल्या.

महिला घरी न पोहोचल्याने नातेवाईकांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर ओतुर पोलिसांनी बनकरफाटा, ओतुर, जुन्नर, पारगाव मढ व कल्याण मुरबाड येथे नातेवाईकांच्या मदतीने शोध घेतला. अखेर टोकाकडे जवळील वस्तीवर महिला मुलांसह सुखरूप आढळून आल्या.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभमकुमार, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, महिला पोलीस हवलदार मोहिनी जाधव, रेश्मा फापाळे,मयुरी खोसे यांनी ही शोध मोहीम राबवली. पोलिसांच्या या तत्परतेमुळे एक कुटुंब सुखरूप एकत्र आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

No comments:

Powered by Blogger.