Header Ads

दाजीपूर अभयारण्य आजपासून पर्यटकांसाठी बंद; वन विभागाचा महत्त्वाचा निर्णय

 दाजीपूर अभयारण्य आजपासून पर्यटकांसाठी बंद; वन विभागाचा महत्त्वाचा निर्णय.

----------------------------------------
राधानगरी प्रतिनिधी / विजय बकरे.
-----------------------------------------

महाराष्ट्रातील गव्यांच्या नैसर्गिक अधिवासासाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य (राधानगरी वन्यजीव अभयारण्य) आजपासून पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेसह वन्यजीव संरक्षणाचा विचार करून वन विभागाने हा निर्णय घेतल्याची माहिती वन्यजीव वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांनी दिली.

दाजीपूर अभयारण्य हे घनदाट जंगल, जैवविविधता आणि विशेषतः भारतीय गवा (बायसन) यांसाठी राज्यभर प्रसिद्ध आहे. मात्र, पावसाळ्यात जंगलातील रस्ते निसरडे होणे, नाले-ओढ्यांना पूर येणे आणि वन्यजीवांच्या प्रजनन कालावधीला सुरुवात होणे या बाबी लक्षात घेऊन अभयारण्यातील पर्यटन व जंगल सफारी सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्या आहेत.

हवामानातील सुधारणा, पावसाची परिस्थिती आणि वनक्षेत्रातील सुरक्षिततेचा आढावा घेतल्यानंतर अभयारण्य पुन्हा पर्यटकांसाठी खुले करण्याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.

वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांनी नागरिक आणि पर्यटकांना आवाहन करताना सांगितले की, अभयारण्य बंद असताना प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नये तसेच वन विभागाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. वन्यजीवांचे संरक्षण आणि पर्यटकांची सुरक्षितता हेच या निर्णयामागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, पावसाळ्यात निसर्गाने नटलेल्या दाजीपूर परिसराचे सौंदर्य खुलून येत असले तरी अभयारण्यातील अधिकृत पर्यटन सेवा पुढील आदेशापर्यंत बंद राहणार असल्याने पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

No comments:

Powered by Blogger.