मिरजेत गोवंश कत्तलीवर पोलिसांचा मोठा छापा; ३७ जनावरांची सुटका, १४०० किलो मांसासह ५.१० लाखांचा मुद्देमाल जप्त
मिरजेत गोवंश कत्तलीवर पोलिसांचा मोठा छापा; ३७ जनावरांची सुटका, १४०० किलो मांसासह ५.१० लाखांचा मुद्देमाल जप्त.
------------------------------मिरज शहरातील मोमीन गल्ली, बोकड चौक परिसरात सुरू असलेल्या कथित गोवंश कत्तलीच्या प्रकारावर मिरज शहर पोलिसांनी बुधवारी धडक कारवाई करत ३७ जनावरांची सुटका केली. या कारवाईत तब्बल १४०० किलो मांस, एक पिकअप वाहन आणि जनावरे असा एकूण ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून शोधमोहीम राबवली. यावेळी मोठ्या प्रमाणात गोमांस तसेच ३७ लहान-मोठी गोवंशीय व म्हैसवर्गीय जनावरे आढळून आली. घटनास्थळी गोमांसाने भरलेले वाहनही पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले.
प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये अजिज बेपारी, सलमान हारुण बेपारी, लाल्या (पूर्ण नाव उपलब्ध नाही) आणि सुरज कबीर सय्यद (सर्व रा. मिरज) यांचा समावेश आहे.
जप्त मुद्देमाल
• १४०० किलो मांस – किंमत सुमारे ₹३०,०००
• ५ मोठ्या गायी – किंमत ₹५०,०००
• ३२ वासरे (२४ गोवंशीय व ८ म्हैसवर्गीय) – किंमत ₹१.३० लाख
• महिंद्रा पिकअप (एमएच-१० डीटी-४७३७) – किंमत ₹३ लाख एकूण जप्त मुद्देमाल : ₹५.१० लाख
कारवाईदरम्यान मुक्त करण्यात आलेल्या सर्व जनावरांना सुरक्षिततेच्या दृष्टीने गोशाळेत हलविण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.
मिरज शहरातील या मोठ्या कारवाईमुळे अवैध गोवंश कत्तल करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांच्या धडक मोहिमेची जिल्हाभर चर्चा सुरू आहे.

No comments: