Header Ads

परळे निनाईत राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात; गुणवंत विद्यार्थी व नवोदित पोलिसांचा गौरव

परळे निनाईत राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात; गुणवंत विद्यार्थी व नवोदित पोलिसांचा गौरव...

--------------------------------------
मलकापूर प्रतिनिधी : रोहित पास्ते.
--------------------------------------
शाहूवाडी तालुक्यातील परळे निनाई येथील वसाहत क्रमांक १, धनगरवाडा येथे जय मल्हार प्रतिष्ठानच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी सजलेल्या या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.

गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी राजमाता अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमांना पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचाही प्रतिष्ठानतर्फे सन्मान करण्यात आला.

समाजाप्रती बांधिलकी जपत कार्यक्रमात शालेय गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने होतकरू विद्यार्थ्यांना १५० वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक झाले.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते पोलीस भरतीत यश संपादन केलेल्या युवकांचा गौरव सोहळा. यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजयजी वाघमोडे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य तथा पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष दादा इनामदार यांच्या हस्ते फेटा बांधून नवोदित पोलिसांचा सत्कार करण्यात आला. या गौरवामुळे तरुणांमध्ये प्रेरणा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगवान बाबू फोंडे होते. यावेळी संजयजी वाघमोडे, सुभाष दादा इनामदार, तानाजी वाघमोडे सर आणि संभाजी पाटील सर यांनी मार्गदर्शन करताना अहिल्यादेवींच्या सुशासनाचा आदर्श, सामाजिक कार्य आणि आजच्या युवकांनी स्पर्धा परीक्षांसाठी घेतली पाहिजे अशी जिद्द व तयारी यावर अभ्यासपूर्ण विचार मांडले.

कार्यक्रमाचे आकर्षक सूत्रसंचालन बापू लांबोर यांनी केले. जय मल्हार प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजनात मोलाची भूमिका बजावत कार्यक्रम यशस्वी केला. रात्री स्नेहभोजन आणि वाळवा येथील ‘बिरदेव गोचारलिंग ओविकार मंडळा’च्या पारंपरिक धनगरी ओव्यांनी या जयंती सोहळ्याची रंगतदार सांगता झाली.

No comments:

Powered by Blogger.