सोनोरी येथे वारकरी बालसुसंस्कार शिबिराचा उत्साहात समारोप; बालमनांवर संस्कारांचे सुवर्ण ठसे
सोनोरी येथे वारकरी बालसुसंस्कार शिबिराचा उत्साहात समारो बालमनांवर संस्कारांचे सुवर्ण ठसे.
-----------------------------------------लहान मारोती मंदिर, सोनोरी येथे आयोजित करण्यात आलेल्या "वारकरी बालसुसंस्कार व भागवत धर्म व्यक्तिमत्व विकास शिबिराचा" नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. दिनांक २० मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या शिबिरात परिसरातील अनेक बालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत संस्कार, अध्यात्म, शिस्त आणि भारतीय संस्कृतीचे धडे आत्मसात केले.
या शिबिराचे आयोजन श्री वासुदेवराव गणोरकर यांनी केले होते. तर ह.भ.प. कु. नम्रता वासुदेवराव गणोरकर, ह.भ.प. रोहित सुनील गणोरकर, ह.भ.प. श्रीवेद घनश्याम जावरकर आणि ह.भ.प. राहुल महाराज खोंड यांनी प्रशिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शिबिरामध्ये संतांची ओळख, आदर्श दिनचर्या, भारतीय संस्कृती, वारकरी संप्रदाय, आहार संस्कृती, व मोबाईलच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच टाळ वादन, हरिपाठ, वैष्णव नर्तन, हनुमान चालीसा पठण, गीता संहितेचा अभ्यास, ग्रामस्वच्छता यांसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळाली.
दररोज पहाटे नगरप्रदक्षिणा व काकडा आरतीने दिवसाची सुरुवात होत होती. दिवसभर विविध व्याख्याने, श्लोक अध्ययन आणि धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिक मूल्यांची रुजवण करण्यात आली.
अधिकमासानिमित्त १ जून रोजी श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक वातावरण अनुभवले.
शिबिराच्या समारोपप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. उपस्थित पालकांनी आणि ग्रामस्थांनी अशा संस्कारक्षम उपक्रमांचे कौतुक करत भविष्यातही अशा शिबिरांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
"राम कृष्ण हरी" आणि "हनुमंत सदा सहायते" या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

No comments: