Header Ads

गांधीनगरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चर्चा; मारहाणीच्या नव्या घटनेने नागरिकांत चिंता.

 गांधीनगरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चर्चा; मारहाणीच्या नव्या घटनेने नागरिकांत चिंता.


कोल्हापूर, दि. 13 जून : गांधीनगर परिसरातील वळिवडे कॉर्नर येथे शालेय वादाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या कथित मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघेजण जखमी झाले असून, गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशिष भगवानदास निरंकारी यांच्या तक्रारीवरून जोतेष धरमकुमार वासवाणी, अनुज सनी बंदवाणी आणि त्यांच्या चार ते पाच अनोळखी साथीदारांविरुद्ध भा.न्या.सं.च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, एका 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याचा आणि आरोपींपैकी एका व्यक्तीचा पूर्वी शालेय जीवनात वाद झाला होता. त्या वादाचा राग मनात धरून 12 जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास वळिवडे कॉर्नर परिसरात संबंधित अल्पवयीन विद्यार्थ्यास काचेच्या बाटलीने मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.

तसेच, त्याच्या मदतीसाठी गेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन युवकालाही मारहाण करून जखमी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेत मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या फिर्यादी अशिष निरंकारी यांनाही मारहाण करून दुखापत करण्यात आल्याचा आरोप आहे.

या घटनेनंतर परिसरातील काही नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या मारामारीच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे. व्यापारी आणि रहिवासी वर्दळ असलेल्या भागांमध्ये पोलीस गस्त वाढविणे, संवेदनशील ठिकाणी अधिक लक्ष देणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास गांधीनगर पोलीस ठाण्याकडून सुरू असून संबंधित आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. प्रकरणातील सर्व बाबींची पडताळणी करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

No comments:

Powered by Blogger.