Header Ads

कांटे–करंजफेण मार्गावर पुन्हा मृत्यूचा सापळा,दोन जीव घेतलेल्या ठिकाणी पुन्हा झाडाची विशाल फांदी अडकली; कधीही होऊ शकतो भीषण अपघात

 कांटे–करंजफेण मार्गावर पुन्हा मृत्यूचा सापळा,दोन जीव घेतलेल्या ठिकाणी पुन्हा झाडाची विशाल फांदी अडकली; कधीही होऊ शकतो भीषण अपघात.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शाहूवाडी | प्रतिनिधी : आनंदा तेलवणकर.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

कांटे–करंजफेण मुख्य मार्गावर पुन्हा एकदा मृत्यूचा सापळा तयार झाला आहे. एका मोठ्या झाडाची प्रचंड फांदी तुटून दुसऱ्या झाडावर धोकादायक अवस्थेत अडकून राहिली असून, ती कोणत्याही क्षणी रस्त्यावर कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक, शालेय विद्यार्थी आणि पादचाऱ्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, याच ठिकाणी यापूर्वी झाडाची फांदी कोसळून दोन निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्या दुर्दैवी घटनेनंतरही प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना न केल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झाडे कमकुवत झाली असून, अडकलेली फांदी कधीही खाली पडू शकते. या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी, शालेय वाहने आणि ग्रामस्थांची वर्दळ असते. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाला तातडीने धोकादायक फांदी हटवण्याची मागणी केली आहे. "अपघात झाल्यानंतर पंचनामा करण्यापेक्षा, अपघात होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हीच प्रशासनाची खरी जबाबदारी आहे," अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

"दोन जीव गेल्यानंतरही प्रशासनाला जाग येत नसेल, तर आणखी किती निष्पाप जीवांचा बळी जाणार?" असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. आता प्रशासनाने तातडीने कारवाई करून संभाव्य जीवितहानी टाळावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

No comments:

Powered by Blogger.