Header Ads

जुलमी घरपट्टीविरोधात कुपवाड पेटले! संघर्ष समितीचे बेमुदत आमरण उपोषण सुरू; वाढीव घरपट्टी तात्काळ रद्द करण्याची मागणी.

 जुलमी घरपट्टीविरोधात कुपवाड पेटले!संघर्ष समितीचे बेमुदत आमरण उपोषण सुरू; वाढीव घरपट्टी तात्काळ रद्द करण्याची मागणी.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मिरज-कुपवाड | प्रतिनिधी : राजू कदम.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वाढीव घरपट्टीविरोधात कुपवाड शहर व परिसर संघर्ष समितीने बुधवारी सोसायटी चौकात बेमुदत आमरण उपोषण सुरू करत महापालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडले. २० जुलैच्या महासभेत घरपट्टी दरवाढ रद्द किंवा कमी करण्याबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

संघर्ष समितीने यापूर्वी महापालिका आयुक्त, महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन वाढीव घरपट्टी मागे घेण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावर सकारात्मक निर्णय न झाल्याने अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आला.

आंदोलनस्थळी "जुलमी घरपट्टी रद्द करा", "सामान्य नागरिकांवर अन्याय बंद करा" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. वाढीव घरपट्टी तात्काळ रद्द करण्यात यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघर्ष समितीने दिला आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व प्रा. अशोक रासकर, आशुतोष धोतरे, गोरख कनकडे, कुलभूषण कर्नाळे, अरुण रुपनर, दाऊद मुजावर यांच्यासह संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिकांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कुपवाड पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला.

No comments:

Powered by Blogger.